शिरपूर केमिकल फॅक्टरी स्फोटात 13 ठार
72 कामगार जखमी ; स्फोटाच्या भीतीने वाघाडी गाव केले खाली ; मयताच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर
शिरपूर : वाघाडी रस्त्यावरील मॉ बिजासनी केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी अचानक तीन रासायनिक टाक्यांचा स्फोट होवून तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला तर 72 कामगारांसह नागरीक जखमी झाले. स्फोटाचा आवाज तब्बल 15 ते 20 किलोमीटरपर्यंत ऐकू आला तर या घटनेत शेतात काम करणारे शेतमजूरदेखील जखमी झाले. मयतांमध्ये दोन महिन्यांच्या चिमुकल्या मुलीसह सहा वर्षीय मुलगी तसेच अन्य चार महिला व सात पुरूषांचा समावेश आहे. दरम्यान, हा प्रकार घातपाताचा तर नाही ना? या शक्यतेसाठी एटीएसचे पथकदेखील घटनास्थळी पोहोचले आहे.
स्फोटानंतर प्रशासनाची धाव
स्फोटानंतर घटनास्थळी पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी डी.गंगाधरण, पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक एम.एन.रत्नपारखी, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह अनेकांनी धाव घेतली. बॉयलरचा सातत्याने स्फोट होत असल्याने आग विझविण्याच्या मदत कार्यात अडथळा निर्माण होत आहे. आग विझवण्यासाठी शिरपूर नगरपरीषदेसह गोल्ड फॅक्टरी, सुतगिरणी तसेच खान्देशातील ठिकठिकाणच्या पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले.
सुरक्षेसाठी वाघाडी ग्रामस्थांचे स्थलांतर
समजलेल्या माहितीनुसार, या फॅक्टरीत सहा बॉयलर असून आतापर्यंत चार बॉयलरचे स्फोट झाले तर जमिनीखाली असलेल्या टाक्यांचा स्फोट होण्याच्या भीती फॅक्टरीनजीक असलेले संपूर्ण वाघाडी गावातील लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. दरम्यान, मुंबईच्या उमीत ग्रुपने ही फॅक्टरी चालवण्यास घेतली असल्याची माहिती आहे.
मृतांना पाच लाखांची मदत जाहीर
अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी स्फोटातील मयत व्यक्तीच्या वारसांना शासनाने प्रत्येकी पाच लाखाची मदत तसेच जखमींचा सर्व खर्च शासन करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच रावल हे मुंबईहुन शिरपूरकडे रवाना झाले.
13 जण जागीच ठार
प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार मयतांमध्ये रोशनी गितेंद्र पावरा (10, पानसेमल), पिनाबाई जितेंद्र पावरा (40, चांदसूर्या), सुवर्णा नरेश पावरा (दोन महिने, जामन्यापाडा), सुनीता विशाल पावरा (23, वाकपाडा), विया सुभाष पावरा (6, पानसेमल), सुबीबाई रमेश पावरा (25, चांदसूर्या), राजेंद्र मंगल राठोड (32, अर्थे), उज्जैनसिंग पदमसिंग राजपूत (31, अर्थे), किशोर मुरलिधर शेवलीकर (24, शिरपूर)
मनोज सजन कोळी (40, वाघाडी), मुकेश गोपाळ माळी (21, शिरपूर), 21 वर्षीय अनोळखी पुरूष (शिरपूर), नितीन संतोष कोळी (23, वाघाडी) यांचा समावेश आहे. दरम्यान, जखमी असलेल्या 78 नागरीकांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालय तसेच धुळ्यात हलवण्यात आले आहे.