जगात शांतता नांदण्यासह कोरोनाच्या समूळ नायनाटसाठी प्रार्थना
यावलमध्ये खिर्णीपुरा पंच कमेटीने केली प्रार्थना
यावल : सुमारे शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेला व राज्यात एकमेव यावल शहरात साजरा होणारा पेहरन-ए-शरीफ उत्सव कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला. गुरुवारी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी औपचारीकरीत्या पार पाडण्यात आला व जगात शांतता नांदावी तसेच कोरोना विषाणूचा समूळ नायनाट व्हावा यासाठी खिर्णीपुरा पंच कमेटीच्या वतीने प्रार्थना (दुवा पठण) करण्यात आले.
शंभर वर्षांची परंपरा प्रथमच खंडित
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात बैठक घेवून आयोजकांशी चर्चा केली होती व जागेवरच धार्मिक विधी पार पाडण्याचे तसेच मिरवणूक उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी डांगपुरा भागात बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन तब्बरूक (पवित्र वस्त्र) काढून धार्मिक विधी पार पाडत दुवा पठण करण्यात आली व जागेवर औपचारीकता पुर्ण करून समारोप करण्यात आला. या प्रसंगी खिर्णीपुरा उत्सव समितीचे अध्यक्ष हाजी इकबाल खान, उपाध्यक्ष गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर, हाजी अताउल्ला खान, शेेख इसाक, सैय्यद युनूस सैयद युसूफ, सईद शाह उर्फ भुराभाई, हाजी गफ्फार शाह, करीमोद्दीन चिरागोद्यीन, सलीम खान, आशिक खान, सइद खा, हाजी असलम खान सह आदींची उपस्थिती होती.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रभारी पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोलिस सहकारी व गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला कर्मचारी कर्मचार्यांतर्फे कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला. दरम्यान, पेहरन उत्सवानंतर दुसर्या दिवशी होणारी कुस्त्यांची दंगलही कोरोनामुळे रद्द करण्यात आली. सुमारे शंभर वर्षांपासून अधिक वर्षांची परंपरा यंदा प्रथमच कोरोनामुळे खंडित झाली.

