भुसावळातील खून प्रकरणी आरोपीला पोलिस कोठडी


भुसावळ : किरकोळ कारणावरून रेल्वेत गँगमन असलेल्या तरुणावर एका तरुणाने पेपर कटरने गळ्यावर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जामनेर रोडवरील हॉटेल खान्देश परमीट रूम अ‍ॅण्ड बिअर बारमध्ये शुक्रवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत पिंटू उर्फ विकास वासुदेव साबळे (35, गंगारॉम प्लॉट, भुसावळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी संशयीत आरोपी निलेश चंद्रकांत ताकदे (26, जुना सातारा, भुसावळ) यास अटक केल्यानंतर शनिवारी त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

‘पिंटू’ म्हटल्याची कुरापत बेतली जीवावर
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे पिंटू उर्फ विकास वासुदेव साबळे हा जामनेर रोडवरील खान्देश बिअर अ‍ॅण्ड बार या हॉटेलमध्ये मद्य प्राशनासाठी बसला असताना तेथे संशयीत आरोपी निलेश ताकदे आला, त्यावेळी त्याने विकास यास पिंटू, असे संबोधले. याचा पिंटूला राग आल्याने त्याने त्यास तुझ्यापेक्षा मी वयाने मोठा आहे, मला एकेरी बोलू नको, असे सांगितले त्यावेळी निलेशने त्यास सॉरी म्हटले व तो तेथून निघून गेला. काही वेळाने निलेश पुन्हा तेथे आला व त्यानेही एका टेबलावर बसून मद्यप्राशन केले. त्यावेळी पिंटूदेखील काऊंटरवरच मद्य प्राशन करीत असताना पुन्हा त्याच्याजवळ आरोपी निलेश आला व त्याने पुन्हा त्यास सॉरी म्हटले, यावेळी पिंटूनेदेखील त्यास माफ करीत बार मॅनेजरकडे वळून पॅक मागितला तोच आरोपीने आपल्या जवळील पेपर कटरने पिंटूच्या गळ्यावर जोरदार वार केल्याने प्रचंड रक्ताचा सडा पडल्याने पिंटू धारातीर्थी पडला. या घटनेने हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांची पळापळ झाली तर आरोपीदेखील अलगद निसटून घरी परतला. अति रक्तस्त्राव झाल्याने पिंटूचा उपचारापूर्वीच जागीच करुण अंत झाला होता.


कॉपी करू नका.