भुसावळच्या विकासासाठी जादा निधी द्या ; आमदारांसह शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना साकडे
मुख्याधिकार्यांच्या कार्यपद्धत्तीचा वाचला पाढा ; आमदार सावकारेंसह शिष्टमंडळाने नांदेडमध्ये घेतली भेट
भुसावळ : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना शहरात विकासकामे करण्यासाठी जादा निधी द्यावा, 16 कोटींच्या निधीतून 24 प्रभागांची कामे होणार नसल्याने आणखीन निधी मंजूर करावा तसेच रस्ता कामांबाबत आदेश द्यावी तसेच पालिकेच्या मुख्याधिकारी नवीन असल्याने स्वाक्षर्या विविध कामांच्या फाईलीवर स्वाक्षर्या करीत नसल्याने शहराचा विकास रखडल्याची व्यथा आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात गेलेल्या भाजपा नगरसेवकांनी नांदेड येथे मुक्कामी थांबलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली. यावेळी विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचे फडणवीस यांनी आश्वासन दिले.
मुख्याधिकार्यांना विरोध -आमदार सावकारे
आमदार संजय सावकारे म्हणाले की, मुख्याधिकार्यांना विरोध नाही मात्र मुख्याधिकारी म्हणून त्यांनी प्रथमच जवाबदारी स्वीकारली असून अ वर्ग पालिकेची त्यांना जवाबदारी मिळाली आहे. तत्कालीन मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्या काळातील प्रलंबित कामांचा निपटारा करणे गरजेचे असल्याने मुख्यमंत्र्यांच्या कानावर या बाबी टाकण्यात आल्या. मुख्याधिकार्यांना विरोध नाही किंवा त्यांना हटवण्यासंदर्भातही आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली नसल्याचे ते म्हणाले.