माजी मंत्री खडसेंनी लढावी आर-पारची लढाई


पालकमंत्री गुलाबराव पाटील : फडणवीसांनी संपवला ओबीसी नेता

जळगाव : एकनाथराव खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील युद्ध असेच चालते, पण पुन्हा बंद पडते. हे युद्ध कायम चालत राहिले पाहिजे. कोणतीही गोष्ट हातात घेतली म्हणजे ती धसास लावली पाहिजे. खडसे यांच्या रुपाने फडणवीस यांनी आमच्या उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला आहे. आता खडसेंनी पूर्ण युद्ध लढायला हवे. बोलायचे आणि पुन्हा बंद करायचे, हे माझ्या स्वभावात बसत नाही. खडसेंनी आता आरपारची लढाई लढली पाहिजे. खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्त्व राहणार नाही. युद्ध आणि कुस्ती कधीही अपूर्ण खेळायची नसते, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील येथे म्हणाले. सोमवारी दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री आले असता त्यांंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना रनौत, नौदलाच्या माजी अधिकार्‍याला झालेली मारहाण अशा विषयांवर मते मांडत भाजपवर टीकास्त्र डागले.

राज्यातील ओबीसी नेता संपवला
पालकमंत्री म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या रुपाने उत्तर महाराष्ट्रातील एक ओबीसी नेता संपवला आहे. ग्रामीण भागातील ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी ते असेच प्रयत्न करत आहेत. खडसे विरुद्ध फडणवीस वादात त्यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत उडी घेतल्याने राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या आणि कंगना प्रकरणावरून गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, राष्ट्रपतीसारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा कार्यक्रम माध्यमांवर मिनिट टू मिनिट दाखवला जातो. परंतु, सुशांतसिंग राजपूत आणि कंगना यांच्या बाबतीत आता माध्यमे मिनिट टू मिनिट कार्यक्रम दाखवत आहेत. हे अयोग्य आहे. सुशांतने काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. एकीकडे शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असताना त्याची कधी सीआयडी चौकशीची मागणी भाजपने केली नाही. 52 टक्के रोजगार देणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची कधी सीआयडी चौकशी होत नाही. एवढेच काय तर गोपीनाथ मुंडेंसारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी भाजपला का करावीशी वाटली नाही? बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी असल्यानेच भाजपकडून असे राजकारण सुरू आहे. यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन भाजपला सत्ता मिळवायची आहे. म्हणूनच भाजपचे हे थोतांड सुरू असल्याचा घणाघात देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !