भुसावळातील काही पोलिसांची गुन्हेगारांशी सलगी


आमदार संजय सावकारे यांचा टोला : गुन्हेगारांशी संबंध असलेल्या पोलिसांच्या उचलबांगडीची गरज

भुसावळ : भुसावळ पोलिस दलातील काही पोलिसांचे अद्यापही गुन्हेगारांशी संबंध असून अशा कर्मचार्‍यांच्या बदलीची आवश्यकता आहे, गुन्हेगार थेट पोलिस ठाण्यात येवून पोलिसांसमोर बसतात त्यामुळे ही बाब योग्य नाही, असा टोला आमदार संजय सावकारे यांनी भुसावळातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत जिल्हा पोलिस अधीक्षकांसमोरच लगावल. आमदारांच्या वक्तव्याने गुन्हेगारांशी सलगी असलेल्या भुसावळ पोलिस दलातील कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून भुसावळातील काही डीबी कर्मचार्‍यांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार म्हणाले हे व्यासपीठ नाही मात्र बोलणे गरजेचे
अहिल्या देवी कन्या विद्यालयात गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व शांतता समितीची जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी भुसावळातील वाढत्या गुन्हेगारी व पोलिस दलाच्या कृतीविषयी नाराजी व्यक्त करीत तक्रारी मांडल्या. याप्रसंगी आमदार संजय सावकारे यांनीदेखील पोलिसांचा आदर सर्वांनीच करावा, असे सांगत भुसावळ पोलिस दलातील काही पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचा पुर्नउच्चार करीत अशांची बदली होणे आता गरजेचे असल्याचे सांगितले. पोलिस ठाण्यात थेट गुन्हेगार येवून पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांसोबत बसतात, असेही त्यांनी सांगत सण उत्सव आनंदात साजरे करावे मात्र उत्सवात पोलिसांचे संरक्षण घेणे ही बाब चुकीची असल्याचे त्यांनी सांगत पोलिसांचा आदर करावा, असेही आवाहन केले.

‘त्या’ पोलिस कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ
गुन्हेगारीमुळे प्रचंड बदनाम झालेल्या भुसावळात आता काही पोलिसांचे गुन्हेगारांशी लागेबांधे असल्याचे वक्तव्य थेट आमदारांनी शांतता समितीत केल्यानंतर ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍यांसह पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.  यात कितपत तथ्य आहे वा नाही खरेतर यााची चौकशी होवून कारवाई होणे गरजेचे आहे. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ अर्थात ‘सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश’ हे ब्रीद पोलिसांचे असलेतरी भुसावळातील काही पोलिसांना मात्र या ब्रीदचा विसर पडल्याचे दिसून येते. भुसावळातील लाच प्रकरणाने आधीच पोलिस दलाची बेअब्रू झाली असताना या प्रकरणात थेट बाजारपेठ पोलिस निरीक्षकांचे नाव आल्याने त्यांचीही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी उचलबांगडी केली त्यामुळे शांतताप्रिय शहरात अशा अप्रिय घटना टळण्यासह सर्वसामान्य नागरीकांमध्ये पोलिस दलाविषयी आदरयुक्त भीती व गुन्हेगारांना ‘धडकी’ भरण्याची कृती केल्यानंतरच खरे तर पोलिस दलाची मान उंचावणार आहे मात्र त्यासाठी खरी गरज आहे तत्कालीन भुसावळचे सहा.पोलिस अधीक्षक व आता नागपूर डीसीपी असलेल्या निलोत्पल यांच्यासारख्या जिगरबाज अधिकार्‍यांची ! जिल्ह्यातील भाऊ-दादांच्या आशीर्वादाने वर्षानुवर्षे सुरू असलेल्या क्लबवर ज्यांनी कधी रेड करण्याची हिंमत केली नाही, अशांवर कारवाईचा आसुड उगारण्याची तर अट्टल गुन्हेगारांना त्यांच्याच वस्तीत जावून नागडे करून त्यांना पोलिसी खाक्या दाखवणार्‍या जिगरबाज अधिकार्‍यांची !


कॉपी करू नका.