नाथाभाऊंच्या जोरावर निवडून आलेल्या सत्ताधार्यांनी विश्वास सार्थ ठरवावा
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांचा पलटवार : रस्त्यांचा दर्जा राखला जाण्याची अपेक्षा
भुसावळ : भुसावळात तीन कोटींच्या रस्ता कामांच्या शुभारंभप्रसंगी तत्कालीन सत्ताधार्यांवर सत्ताधारी व लोकप्रतिनिधींनी टिकेची तोफ डागल्यानंतर त्यास दुसर्या दिवशी मंगळवारी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पत्रातून उत्तर दिले आहे. भुसावळात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जोरावर निवडून आलेल्या सत्ताधार्यांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवावा, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे. नेमाडे कळवतात की, माजी मंत्री खडसे व खासदार रक्षा खडसे यांनीच भुसावळातील जनता कामे न झाल्याने जाब विचारत असून मुक्ताईनगरापर्यंत तक्रारी करीत असल्याचे सांगून शहरात विकासकामे न झाल्याचे प्रमाणपत्रच त्यांनी भर सभेत दिले आहे. जनतेच्या समस्यांसाठी आपण आवाज उठवल्यानंतर आपला आवाज दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही नेमाडे यांनी केला आहे.
नेत्यांनीच दिले विकास न झाल्याचे प्रमाणपत्र
नेमाडे पत्रात कळवतात की, तीन महिन्यात शहराचा चेहरा-मोहरा बदलणार होता मात्र आश्वासन देतांना कामात अडचणी येतात याचा विचार त्यावेळी केला नव्हता का ? भुसावळकरांना आता फसवू नका, अमृत योजना आमच्याच काळात तयार झाली व तुम्ही काही लोक लावून कामात अडथळे आणले मात्र साडे चार वर्ष उलटूनही अमृत योजना पूर्णत्वास आलेली नाही. शहरात रस्ते नाही, साफसफाई नाही, पाणीपुरवठा सुरळीत नाही, नालेसफाई नाही, हायमास्ट बरेच बंद आहेत व असे असताना शहरात विकासकामे झाल्याचा दावा हास्यास्पद आहे. कोरोना काळात नागरीकांना वार्यावर सोडलेले आज भुसावळकरांना उपदेशाचे डोस पाजत आहेत शिवाय आता आपल्या नेत्यांनी अर्थात नाथाभाऊंनीच तुमच्यावर कामाबाबत समाधानी नसल्याचा ठपका ठेवून भर सभेत प्रमाणपत्र दिले आहे. भूमिपूजन करून दोन वेळा दुरुस्ती केलेल्या यावल रस्त्याची एका महिन्यांत काय अवस्था झाली आहे हे भुसावळातीलच नाही तर यावल-रावेर रस्त्यावरून वापर करणार्या वाहनधारकांनी अनुभवल्याने आता भुमिूपूजन झालेल्या रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे : नगराध्यक्ष
शहरात मोठ्या प्रमाणावर पालिकेच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत जी यापूर्वी अशा पद्धत्तीने कधीही झालेली नाही. शहरातील रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यास शासनाच्या वेगवेगळ्या आदेशाप्रमाणे विलंब लागला शिवाय यावल रस्त्याचा प्रश्न नगरपालिकेचा नाही. अमृत योजनेच्या ठेकेदाराला कायदेशीर नोटीस बजावल्या असून एमजीपीनेदेखील त्यांना दंड सुनावला आहे. विरोधकांचा प्रश्न आता संपला असून त्यांच्या टिकेकडे आम्ही दुर्लक्ष करतो व शहर विकासाचा आता केवळ ध्यास असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले.

