जळगावात सेवानिवृत्त प्राध्यापकाचे बंद घर फोडले


जळगाव- पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी शहरात घरफोड्यांचे सत्र अवलंबले असून मंगळवारी पुन्हा तीन घरफोड्या झाल्याने नागरीक धास्तावले आहेत. शिक्षकवाडी भागातील निवृत्त प्राध्यापकाने बाहेरगावी जाण्यापूर्वी लाखो रुपयांची रोकड व दागिने ठेवलेली पेटी पुस्तकांनी भरलेल्या कपाटाखाली लपवून ठेवल्याने रोकड सुरक्षित राहिली तर चोरट्यांनी फ्रिजमध्ये ठेवलेल्या खाद्यपदार्थांसह मलईवर ताव मारला आहे.

सेवानिवृत्त शिक्षकाकडे घरफोडी
शासकीय आयटीआयच्या मागच्या बाजूस असलेल्या मोठ्या नाल्याला लागून शिक्षकवाडीतील बंगल्यात अशोक जनार्दन चौधरी हे पत्नी वसुधा यांच्यासह राहतात. चौधरी हे मू.जे. महाविद्यालयात प्राध्यापक पदावरून निवृत्त झालेले आहेत. तर त्यांची मुले अंकुश व पीयूष हे दोघे पुणे येथे राहतात. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चौधरी दांपत्य 30 ऑगस्ट रोजी पुण्याला गेले होते. बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या दुमजली घरातील प्रत्येक खोलीतील साहित्य, ड्रॉवर, कपाटे फोडून सामान अस्ताव्यस्त केला. देवघर, फ्रिजमध्येही चोरट्यांनी तपासणी केली. संपूर्ण घरात नासधूस केल्यानंतर चोरटे निघून गेले होते. शेजारच्यांनी चोरी झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, पोलिस निरीक्षक अकबर शेख यांच्यासह डीबी पथकातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद कॉलनीमध्ये दोन घरे फोडली
शहरातील दादावाडी परीसरातील आनंद कॉलनी भागातील सुभद्राबाई मधुकर चौधरी व त्यांच्या शेजारी राहणारे भगवान आनंदा हरणे यांची घरे चोरट्यांनी फोडली. सुभद्राबाई या एकट्याच राहतात. त्या सहा दिवसांपूर्वी गणेश कॉलनी येथे राहणारी मुलगी अर्चना पाटील यांच्याकडे गेल्या होत्या. चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाच्या कडी-कोयंडा कटरने कापून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून सुमारे तीन हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली.


कॉपी करू नका.