खडसे म्हणाले, देवेंद्र फडणविसांवर मी नाराज असल्याने भाजपाला सोडचिठ्ठी !
मुक्ताईनगर : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी फार्म हाऊसवर पत्रकार परीषद घेत भाजीपाला सोडचिठ्ठी दिल्याची कबुली दिली. ते म्हणाले की, 40 वर्ष पक्षासाठी दिले, माझे उभे आयुष्य खर्ची केले मात्र दुःख या गोष्टीचे आहे की, माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी व काँग्रेसने माझ्या राजीनाम्याची मागणी केली नसताना माझा राजीनामा घेण्यात आला. खडसे म्हणाले की, माझी भाजपाविषयी तक्रार नाही, केंद्रीय नेतृत्वाविषयी वा प्रदेश कार्यकारीणीवर नाराज नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्यानेच मी भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचे ते म्हणाले.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले भाजपातच
खडसे म्हणाले की, भाजपासाठी उभे आयुष्य घालवले मात्र माझ्या चौकशा फडणवीसांनी लावल्या व त्यामुळे प्रचंड बदनामी सहन करावी लागली. मला काय मिळाले वा नाही, याच्याशी घेणे देणे नाही. माझ्या कथित पीएवर नऊ महिन्यांपासून पाळत ठेवण्यात आली व त्याची कबुली सभागृहात फडणवीसांनी दिल्याचे ते म्हणाले. जे पद मिळवले तर ते ताकदीनिशी मिळवल्याचे त्यांनी सांगत मोठे आक्षेप असलेले नेते भाजपात कार्यरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जनतेची ताकद माझ्यासोबत असल्याचे ते म्हणाले. खासदार रक्षा खडसे वा अॅड.रोहिणी खडसे यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. भाजपा सोडण्याच्या वेदना प्रचंड होत असून मात्र प्रचंड खालच्या स्तरावर राजकारण करण्यात आल्याचे दुःख असल्याचे ते म्हणाले.

