अंजाळेत किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण : तिघांविरुद्ध गुन्हा


यावल- तालुक्यातील अंजाळे येथे शेतात तणनाशक फवारले तसेच शेतात वाहून आलेली वाळू परस्पर का उचलून नेली ? अशी विचारणा केल्याचा राग आल्याने दोघांना तिघा संशयीत आरोपींनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू गिरधर सपकाळे (55,रा.अंजाळे) यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सकाळी आठ वाजता ते गावातील चौकात उभे असताना संशयीत आरोपी कृष्णा बळीराम सपकाळे यांनी तुम्ही माझ्या शेतात तणनाशक फवारणी का केली व शेतात वाहून आलेली वाळू का परस्पर वाहून नेली, असे विचारत वाद घातला. या गोष्टीचा राग येवुन कृष्णा भगवान सपकाळे, शांताराम भिवसन सपकाळे व धनराज शांताराम सपकाळे यांनी दगडू सपकाळे यांना मारहाण केली तर भांडण सोडवण्यास आलेल्या सागर दगडू सपकाळे यांच्या डोक्यातही लाकडी दांड्याने वार करण्यात आले. दोघा जखमींना यावल रुग्णालयात आणल्यानंतर डॉ.एन.डी.महाजन, प्रियंका मगरे, पूनम राऊत, विजय शिंदे आदींनी प्रथमोपचार केले तर अधि उपचारार्थ त्यांना जळगावी हलवण्यात आले. या प्रकरणी यावल पोलिसात वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार नागपाल भास्कर करीत आहेत.


कॉपी करू नका.