खिसे गरम करण्याची पद्धत गिरीश महाजनांना अधिक ठावूक


आमदार शिरीष चौधरींचा टोला : पीपल्स बँकेत पत्रकार परीषदप्रसंगी डागली तोफ

रावेर : केळी पीक विम्याचे निकष बदलवून मिळावे यासाठी आम्ही पाठपुरावा करत असतांना माजी मंत्री गिरीश महाजन पुढे आले नाहीत, राज्य सरकार बैठका घेत असतांना त्यात ते सामील झाले नाही आता मात्र मुदत संपल्यावर यासाठी आंदोलनाची भाषा करत आहे. मंत्री खिसे कसे गरम करतात ? याच्या काही पद्धती त्यांना ठाऊक असतील, कारण ते अनुभवी आणि माजी मंत्री आहेत त्यामुळे मंत्री खिसे कसे गरम करतात ? याबाबत तेच अधिक सांगू शकतील, अशी खरमरीत टीका आमदार शिरीष चौधरी यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर येथे केली. रावेरात मंगळवारी पीपल्स बँकेत त्यांनी पत्रकार परीषद घेत महाजनांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. पत्र परीषदेत आमदार चौधरी यांनी केळी पीक विम्याच्या बाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती डॉ.राजेंद्र पाटील, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, पीपल्स बँकेचे चेअरमन प्रवीण पासपोहे यावेळी उपस्थित होते.

माजी मंत्री महाजनांना हाणला टोला
सोमवारी जळगाव येथे केळी पीक विम्याच्या निकषाच्या मुद्यावर माजी मंत्री गिरीश महाजन व दोन्ही खासदार, जिल्ह्यातील भाजपचे आमदार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरकारवर सरसंधान साधत मंत्र्यांनी खिसे गरम केल्याचा आरोप महाजन यांनी केला होता. या आरोपाचे रावेरात आमदार शिरीष चौधरी यांनी खंडन करून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी आमदार चौधरी म्हणाले की, खासदाररक्षा खडसे वगळता अन्य भाजपच्या पदाधिकारी यांनी केळी विम्यासाठी पाठपुरावा केला नाही. काहींनी एखादी भेट घेवून चर्चा केली मात्र त्यांचे फलित काही दिसले नाही. आम्ही निकष बदलवण्यासाठी बैठका आणि चर्चा करत असतांना, यात कोणी भाजपचे लोकप्रतिनिधी आले नाहीत, मुद्दा मांडला नाही. आता विम्याची मुदत झाल्यावर या विषयावर हीन पातळीवर राजकारण केले जात आहे मात्र शेतकर्‍यांच्या बाबतीत असे गलिच्छ राजकारण करू नये, त्यांना शेतकरी कधी माफ करणार नाही, असे आमदार चौधरी म्हणाले.



माजी मंत्र्यांना खिसे करण्याची पद्धत अधिक ठावूक
माजी मंत्री असलेले गिरीश महाजन यांनी केलेले स्टेटमेंट त्यांना शोभत नाही. ते सत्तेत असताना ज्येष्ठ पदावर होते त्यामुळे खिसे गरम करण्याची पद्धत त्यांना अधिक माहित असेल. त्यांनी त्यांच्या काळात शेतकर्‍यांना कापसासह इतर पिकांना भाव मिळवून दिला का? हे तरी त्यांनी सांगावे, असे सांगत त्यांनी महाजनांवर टिकेची तोफ डागली.

केंद्राचा खरा चेहरा समोर आणण्याचे काम काँग्रेसकडून
केळी पीक विम्याच्या मुद्यावर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारला हेरण्याचा प्रयत्न केला असताना दुसरीकडे केळी बेल्टचे आमदार शिरीष चौधरी यांनी मात्र सरकारची ढाल बनून त्यांना चांगलेच उत्तर देताना दिसून येत आहेत. केळी पीक विम्याचे निकष बदलवून मिळावे यासाठी राज्य सरकार व अधिकारी केंद्र सरकारशी सातत्याने भूमिका मांडून निकष बदलवून मिळावे, अशी मागणी करत असतांना केंद्र सरकारकडून कोणतीच भूमिका न बदलल्याने केळी विम्याचे निकष तेच राहिले. केंद्र सरकार अनेक जबाबदार्‍या झटकत आहे त्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने भूमिका मांडून त्यांचा खरा चेहरा समोर आणत असल्याचे देखील आमदार चौधरी यांनी यावेळी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !