ब्राह्मण समाजाविषयीच्या ‘त्या’ वक्तव्याविषयी माजी मंत्री खडसेंची दिलगिरी
जळगाव : ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी म्हटले आहे. 6 नोव्हेंबर 2020 रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला असून ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसेंनी आपली वक्तव्यावर पडदा टाकला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एकनाथराव खडसेंनी मी मुख्यमंत्रीपद ब्राह्मणाला दान केले असे विधान केले होते. त्यावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाने खडसेंच्या विधानावर आक्षेप घेत त्यांनी तातडीने माफी मागावी, अन्यथा पुण्यात खडसेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, त्यांच्या वक्तव्याचे परीणाम राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशारा ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला होता. ब्राह्मण महासंघाच्या इशार्यानंतर एकनाथराव खडसेंनी ट्विट करुन दिलगिरी व्यक्त केली आहे.
