वरणगाव पालिकेतील भाजपाचे पाच नगरसेवक अपात्र
माजी मंत्री खडसे गटाला धक्का : व्हीप उल्लंघणप्रकरणी जिल्हाधिकार्यांची कारवाई
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव नगरपालिकेत गटनेता सुनील काळे यांनी काढलेला व्हीप झुगारल्याप्रकरणी दाखल याचिकेनंतर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी वरणगावातील भाजपच्या पाच नगरसेवकांना अपात्र केल्याने जिल्ह्याच्या राजकीय गोटात खळबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयाचे विधी अधिकारी अॅड.हरूल देवरे यांनी याबाबतची माहिती दिली. दरम्यान, नगरसेवक अपात्र झाल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे गटाला हा धक्का मानला जात आहे. नितीन माळी, अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, विकीन भंगाळे अशी अपात्र नगरसेवकांची नावे आहेत.
दोन वर्षानंतर ‘व्हीप’ प्रकरणाचा लागला निकाल
2017 मध्ये झालेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यावेळचे गटनेता सुनील काळे यांनी स्वतःलाच मतदान करण्याबाबत व्हीप बजावला होता मात्र व्हीप काढताना विश्वासात घेतले नाही म्हणून भाजपच्या 8 पैकी पाच नगरसेवकांनी सुनील काळे यांना गटनेते पदावरून हटवून नवीन गट नेतेपदी नितीन माळी यांची निवड केली होती. नितीन माळी यांच्या व्हीपनुसार अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, विकीन भंगाळे या पाच नगरसेवकांनी मतदान केले होते. याप्रकरणी भाजपमधील दोन्ही गटांनी एकमेकांच्या अपात्रतेसाठी जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी केल्या होत्या. दोन वर्ष चाललेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर जिल्हाधिकार्यांनी गुरुवारी नितीन माळी, अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे व विकीन भंगाळे यांना अपात्र केल्याने वरणगावात प्रचंड खळबळ उडाली आहे.