भुसावळ बॉम्ब केसच्या घटनेचे चित्र जंक्शनवर दर्शनी भागात लावावे
रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत सदस्य परीक्षीत बर्हाटे यांची मागणी
भुसावळ : देवळाली पॅसेंजर नियमित सुरू करावी, धुळे, पुणे, मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करावी, उधना-पाळधी मेमू गाडी भुसावळपर्यंत वाढवावी, प्रत्येक रेल्वे स्थानकावर मेडीकल आणि डॉक्टरांची व्यवस्था, महाराष्ट्र एक्स्प्रेसला भुसावळातून स्लिपर कोच डबा जोडावा या मागण्यांवर रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत शुक्रवारी चर्चा करण्यात आली. दरम्यान, या बैठकीत भुसावळ बॉम्ब केसच्या घटनेचे चित्र जंक्शनवर दर्शनी भागात लावावे, अशी मागणी रेल्वे सल्लागार समिती सदस्य परीक्षीत बर्हाटे यांनी ऑनलाईन बैठकीत मांडली.
पासधारकांसाठी स्वतंत्र डबा जोडावा
ऑनलाइन बैठकीच्या अध्यक्षस्थानी डीआरएम विवेककुमार गुप्ता होते. भुसावळ जंक्शनवर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचे ‘मॉवजर’ पिस्तूल आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य भगवानदास माहौर व सदाशिवराव मलकापूरकर या क्रांतीकारकाकडून 1929 मध्ये याच ठिकाणी ब्रिटिशांनी पकडले होते. या घटनेचे चित्र रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागावर लावावे, अशी मागणी परीक्षीत बर्हाटे यांनी केली. रेल्वे वस्तू संग्रहालयास माजी खासदार स्व. हरीभाऊ जावळे यांचे नाव द्यावे, रेल्वे पासधारक चाकरमान्यांसाठी गाड्यांना स्वतंत्र डबा जोडावा, अशी मागणी मांडली.

यांची होती उपस्थिती
अपर मंडळ रेल प्रबंधक मनोजकुमार सिन्हा, वरीष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वरीष्ठ मंडळ परीचालन प्रबंधक आर.के.शर्मा, मंडळ वाणिज्य प्रबंधक अरुण कुमार, वरीष्ठ मंडळ अभियंता (समन्वय) राजेश चिखले, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितीज गुरव उपस्थित होते. या बैठकीत रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य ऑनलाईन सहभागी झाले. या बैठकीत राहुल गोयंका (अकोला), विलास नामदेवराव वाडेकर (बडनेरा), प्रवीण सावळे (अमरावती), अयुब खान मुस्तफाखान (बडनेरा), नितीन मधुकर बोरेकर (अमरावती), राजनारायण मिश्रा (अकोला), वसंतकुमार बाछुका (अकोला), जुगलकिशोर कोठारी (अकोला), दिनेश लक्ष्मण शिंदे (शेगाव), संजय पवार (चाळीसगाव), महेंद्रकुमार बुरड (मलकापूर), डॉ.योगेश हेमंतराव सूर्यवंशी (धुळे), विनायक पाटील (जळगाव), चंद्रकांत कासार (जळगाव), अमोल देविदास जाधव (जळगाव), राजेंद्र सोनवणे, वैशाली विजय आरके (ईगतपुरी), पवन रमेश भगुरकर (नाशिक), गुरमीत सिंग रावल (नाशिक), राजेंद्र बाळकृष्ण चाफेकर (लासलगाव), पवन लाठ (बर्हाणपूर), राम गुलाम सोनी (खंडवा), रवी कुमार मलानी (नेपानगर), त्रिलोक पटेल (खंडवा), राजेंद्र जोशी (बर्हाणपूर), हरीश कोटवाले (बर्हाणपूर) उपस्थित होते. सूत्रसंचालन वरीष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांनी तर आभार मंडल वाणिज्य प्रबंधक बी.अरुणकुमार यांनी मानले.

