भुसावळ नगरपालिका रुग्णालयात शवविच्छेदन होणार
डॉ.नी.तु.पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
भुसावळ : भुसावळ पालिकेच्या श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात आता शवविच्छेदन होणार असल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात शवविच्छेदन होत नसल्याने विविध दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सोसावा लागत होता शिवाय पोलिस प्रशासनालादेखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते मात्र स्थानिक स्तरावर सुमारे दहा वर्षानंतर शवविच्छेदन होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. भाजप वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.नी.तू.पाटील यांनी ही मागणी धरल्याने त्यांच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतली आहे.
दहा वर्षांनंतर शहरात शवविच्छेदनाची सुविधा
भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा सेन्टर हे मे महिन्यात कार्यान्वित झाले असून त्याठिकाणी सध्या प्रसुतीगृह सुरू आहे. ट्रामा सेंटरमध्ये शव विच्छेदन खोली बांधण्याबाबत प्रस्ताव प्रगतीपथावर आहे. तोपर्यंत अपघात किंवा अन्य कारणांनी मृत झालेल्यांवर वरणगाव, जळगाव किंवा यावल येथे शवविच्छेदन करावे लागते. याबाबत जोपर्यंत ट्रामा सेंटरमधील शवविच्छेदन खोली बांधकाम होत नाही, तोपर्यंत पालिकेने खोली उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. यानुसार शनिवारी उपमुख्याधिकारी महेंद्र कतोरे, डॉ.नी.तू.पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयुर नितीन चौधरी आदींनी भेट देवून पाहणी केली. गुरुवारपर्यंत वीजपुरवठा, पंखे, ट्यूबलाईट व स्वच्छता करुन पालिका ही शवविच्छेदन खोली सुपूर्द केली जाणार आहे. यामुळे किमान 8 ते 10 वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. यासाठी आमदार संजय सावकारे यांनीही प्रशासनाकीय स्तरावरुन पाठपुरावा केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा सोनवणे, मनसेचे माथाडी कामगार विभागाचे शहराध्यक्ष सुनील उमरीया, पालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी संजय ठाकूर, राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

मृतांच्या नातेवाईकांचा त्रास वाचेल
भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा सेंटरमधील वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर नितीन चौधरी यांना वरणगावला शव विच्छेदनासाठी जावे लागले. त्यामुळे दुसरीकडे ग्रामीण रुग्णालय व ट्रामामध्ये येणार्या रुग्णांना ताटकळत रहावे लागते. मृतांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो, मृतदेहाचीही अवहेलना होते मात्र आता पालिकेने शवविच्छेदन कक्ष उपलब्ध करुन दिल्यास हा प्रश्न सुटून दिलासा मिळणार आहे.

