मका खरेदी करा अन्यथा शेतकर्यांना फरक द्या
बोदवड तालुका शेतकरी संघटनेचे तहसील प्रशासनाला निवेदन
बोदवड : शहरात 6 डिसेंबर रोजी मका खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. मका विक्रीसाठी 850 शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी केली मात्र प्रत्यक्षात केवळ 25 शेतकर्यांकडील मका खरेदी करण्यात आला मात्र शासन उद्दिष्ट पूर्ण झाल्याने आता खरेदी केंद्र बंद करण्यात आल्याने शेतकर्यांमध्ये संतप्त भावना आहेत. उर्वरीत शेतकर्यांकडील मका शासनाने खरेदी करावा अन्यथा बाजार भावातील फरक द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे बोदवड तहसील प्रशासनाकडे करण्यात आली.
तर तीव्र आंदोलनाचा इशारा
निवेदनाचा आशय असा की, शासन मका खरेदी करणार या आशेवर शेतकर्यांनी घरातच मका साठवला असून आता खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत. आठ दिवसात खरेदी केंद्र सुरू न केल्यास शेतकरी बोदवड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांच्यासह प्रवीण मोरे, संतोष पाटील, ज्योती पाटील, रामभाऊ पाटील, राहुल वाघ, दीपक बडगुजर, लोकेश बडगुजर, अनिल देवकर, राजेंद्र चौधरी, निना पाटील, शांताराम गंगतिरे, शिवाजी गंगतिरे, शेख गुलाम शेख हसन, जितेंद्र चौधरी, रतनसिंग पाटील, राहुल जाट यांच्या स्वाक्षर्या आहेत.


