बोदवड तहसीलदारांसह तिघांची जामिनावर सुटका


भुसावळ : शेतीच्या उतार्‍याबाबत काढलेली नोटीस परत घेण्याच्या मागणीसाठी दोन लाखांची लाच मागणार्‍या बोदवड तहसीलदारांसह सर्कल व तलाठ्यास जळगाव एसीबीच्या पथकाने लाच घेताना शुक्रवार, 18 डिसेंबर रोजी बोदवड तहसील कार्यालयात रंगेहाथ अटक केली होती. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 22 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्या.एस.पी.डोरले यांनी तिघांची जामिनावर मुक्तता केली.

तिघाही आरोपींची जामिनावर सुटका
संशयीत आरोपी तथा तहसीलदार हेमंत भागवत पाटील (40, रा.भरडी, ता.जामनेर, ह.मु.बोदवड), मंडळाधिकारी संजय झेंडू शेरनाथ (47, प्रभाकर हॉलजवळ, श्रीराम निवास अपार्टमेंट, दुसरा मजला, ब्लॉक नं.6, भुसावळ) व तलाठी निरज प्रकाश पाटील (34, हेडगेवार नगर, बोदवड) यांना मंगळवारी अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.एस.पी.डोरले यांनी प्रत्येकी 25 हजारांच्या सॉल्व्हन्सीवर जामीन मंजूर केला. आरोपींतर्फे अ‍ॅड.आर.के.पाटील, अ‍ॅड.राजेंद्र रॉय, अ‍ॅड.अश्‍विनी डोलारे तर सरकारतर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी बाजू मांडली.


दोन लाखांची भोवली होती लाच
फैजपूर येथील 53 वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे 2002 मध्ये बोदवड तहसीलच्या हद्दीत शेत खरेदी झाल्यानंतर 7/12 उतार्‍यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावण्यात आले मात्र कालांतराने या शेतीच्या उतार्‍यावर परत मूळ मालकाचे नाव आल्याने तक्रारदार यांनी मंडळाधिकारी यांना भेटून पुन्हा शेतीच्या 7/12 उत्तार्‍यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावले व उतारा घेतला. या उतार्‍याबाबत तहसीलदार, बोदवड यांनी हरकत घेऊन संबंधीत पुरावा देण्याची नोटीस काढली व सदर काढलेली नोटीस रद्द करण्याच्या तहसीलदारांच्या वतीने मंडळाधिकारी व सर्कल यांनी सुरूवातीला 6 व 8 तसेच 9 डिसेंबर रोजी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती व नंतर दोन लाखात तडजोड करण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !