कंडारीतील प्राचीन यात्रोत्सवाची परंपरा खंडित


भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथे मकरसंक्रांतीच्या पर्वावर होणारा श्री कपिलेश्वर महादेव मंदिराचा प्राचीन काळापासून सुरू असलेला यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे ग्रामस्थांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे. प्रशासनाच्या निर्णयानुसार सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत केवळ कपिलेश्वर महादेवाचे दर्शन भाविकांना घेता येईल.

यात्रोत्सवाला 500 वर्षांची परंपरा
कंडारी येथे सुमारे 500 वर्षापासून असलेल्या कपिलेश्वर महादेवाच्या यात्रोत्सव परंपरा आहे मात्र यंदा कोरोनामुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. तहसीलदार दीपक धीवरे यांच्या दालनात मंगळवारी मंदिर ट्रस्ट पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना जाहीर केल्या असून त्यादृष्टीने यात्रोत्सव रद्द केले जात आहे. या मार्गदर्शक सूचनांचा आधारे तहसीलदार धीवरे यांनी कंडारी यात्रोत्सवास परवानगी नाकारल्याचे ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. तसेच धार्मिक विधी मात्र करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे, त्यामुळे यात्रोत्सवाच्या दिवशी पहाटे कपिलेश्वर महादेवाचा अभिषेक व गावातून विविध समाजातर्फे दिली जाणारी मानाची पूजा मात्र कोरोनाचे नियम पाळून शांततेत केल्या जातील. पूजाविधी करताना पाळावयाचे नियम याची संपूर्ण जबाबदारी मंदिर ट्रस्टकडे सोपवण्यात आली आहे. तहसीलदार यांच्याकडे झालेल्या या बैठकीस ट्रस्टचे अध्यक्ष गोकुळ मोरे, सदस्य मुरलीधर जेठवे, हर्षल नारखेडे, भालचंद्र झोपे, सुनील मोरे, पोलीस पाटील रामा तायडे, ग्रामपंचायत सदस्य विषाल खेडकर, अजय मोरे, हिरासिंग चौधरी, सीताराम तायडे आदींची उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !