वरणगावात भाजपाचे जलसमाधी आंदोलन
लवकरच पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या आश्वासनानंतर आंदोलक पाण्याबाहेर : आंदोलकांची आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी
वरणगाव : वरणगाव शहरासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात वरणगावच्या भोगावती नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलकांनी आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात मागण्यांचे फलक झळकावून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी आश्वासन दिले असल्याचे सांगत वर्क ऑर्डर काढण्यात येत असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक पाण्याबाहेर निघाले व नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची सुटका केली.
आंदोलनानंतर योजनेच्या कामाला गती नाही
13 सप्टेंबर 2019 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वरणगाव शहरासाठी 25 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती मात्र 5 डिसेंबर रोजी राज्य सरकारने स्टे दिल्यानंतर 5 जूनच्या सभेत वरणगाव शहर विकास विरोधी आघाडीने 7.77 टक्के निविदा इस्टिमेट दराच्या जास्त दराने निविदा आली म्हणून कर्मचारी पगाराचे निमित्त करीत पाणी योजनेची निविदा नामंजूर केल्याने पाणी योजनेचे काम थांबले. मंजूर पाणी योजनेचे काम सुरू करा या मागणीसाठी भाजपा तर्फे रस्ता रोको, उपोषण झाले मात्र सरकारने दखल न घेतल्याने बुधवारी शेकडो महिला व नागरीकांच्या उपस्थितीत वरणगाव येथील भोगावती नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, अल्लोद्दीन सेठ, अशोक श्रीखंडे, दत्तू मराठे, संजयकुमार जैन, गोलू राणे, भाऊलाल टिंटोरे, ज्ञानेश्वर घाटोळे, कृष्णा माळी, शंकर पवार, संदीप माळी, डॉ.सादीक खान, अॅड.ए.जी.जंजाळे, किरण वंजारी, माजी सरपंच सुभाष धनगर, पप्पू ठाकरे, प्रल्हाद माळी, आकाश निमकर , महेश माळी, किरण वंजारी, चेतन माळी, संदीप भोई, डॉ.प्रवीण चांदणे, बापू माळी, पिंटू माळी, कमलाकर मराठे, हितेश चौधरी, राजू माळी, अरुण बावणे, छोटू सेवतकर, विवेक कुलकर्णी, विशाल कुंभार यांच्यासह दीपाली माळी, कामगार नेते मिलिंद मेढे, डी.के.खाटीक, कुंदन माळी, युसूफ खान यांच्यासह असंख्य प्रचंड महिला सहभागी झाल्या.
हा वरणगावकरांवर अन्याय : सुनील काळे
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आपल्या भाषणात महिला पाण्यासाठी रस्त्यावर उतरत असून आघाडी सरकारने मंजूर पाणी योजनेचे काम सुरू न केल्यास यापुढील एल्गार मोर्चा काढण्याचा इशारा दिला. राज्यात इतर मंजूर योजनेला वर्क ऑर्डर देण्यात आल्या मात्र वरणगाव नगरपरीषदेच्या मंजूर पाणी योजनेच्या कामाला राजकीय आकसापोटी सुरुवात केली जात नाही. हा वरणगाव शहराच्या 50 हजार जनतेवर अन्याय आहे या अन्यायाचा बदला वरणगावकर घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
लवकरच निघणार वर्कऑर्डर
याप्रसंगी मुख्याधिकारी शामकुमार गोसावी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज वर्क ऑर्डरबाबत निर्णय देण्याचे सांगितल्याचे आश्वासन देत लवकरच काम सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितल्यानंतर आंदोलक पाण्याबाहेर निघाले. यानंतर सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी आंदोलनकर्त्यांना पोलिस ठाण्यात आणत त्यांना ताब्यात घेत नंतर त्यांची सुटका केली.

