ध्वनी प्रदूषण करणार्या बॅण्ड पथकांवर गुन्हे दाखल करणर
पोलिस अधीक्षक नरेंद्र पिंगळे यांचा फैजपूरातील बैठकीत इशारा
फैजपूर- गणेशोत्सव व दुर्गोत्सव साजरे करतांना मूर्तीची उंचीची मर्यादा असली पाहिजे याचे भान आपण मंडळातील पदाधिकार्यांनी ठेवले पाहिजे. आपण स्वतःला खूप हिंदू म्हणून समाजात वावरत असतो आणि आपणच देवतांची विटंबना करतो यासारखे दुर्दैव नाही, असे सांगत ध्वनी प्रदूषण करणार्या बॅण्ड पथकासह मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी शांतता समितीच्या बैठकीत येथे दिला. गणेशउत्सव, दुर्गोत्सव व आगामी सणांबाबत शनिवारी संध्याकाळी पाच वाजता फैजपूर पोलीस स्टेशनला शांतता कमिटी व मंडळ पदाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
यांची होती उपस्थिती
तहसीलदार जितेंद्र कुंवर, सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, नगरसेवक शेख कुर्बान, नगरसेवक कलीम मण्यार, डॉ.जलील, पालिका आरोग्य निरीक्षक विपुल साळुंखे, रवींद्र होले, मलक आबीद यांच्यासह शांतता समिती सदस्य, पत्रकार व गणपती मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आपणच करतो मूर्ती विटंबना
डीवायएसपी नरेंद्र पिंगळे म्हणाले की, मूर्तीची उंची ही पाच फुटापर्यंत असली पाहिजे त्यापेक्षा मोठी उंची आणू नये, मोठ्या मूर्तीचे विसर्जन करतांना त्या मूर्तीची विटंबना आपणच करतो. नदीतील पाणी कमी झाल्याने त्या मोठ्या मूर्तीचे व्यवस्थित विसर्जन न झाल्याने त्याच अवस्थेत राहतात आणि प्रदूषण तयार होते त्यामुळे मूर्तीची स्थापना करताना पर्यावरण पुरकच असली पाहिजे, बॅण्डच्या आवाजाची मर्यादा तपासली जाईल. गणेशोत्सव व दुर्गोत्सवात जास्त आवाजाचे बँड आणल्यास बँण्ड पथकावर मिरवणूक संपल्यावर पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.उत्सवादरम्यान जुन्या कारणावरून भांडण केल्यास वा टवाळखोरी केल्यास अशांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी तहसीलदार जितेंद्र कुंवर, एपीआय प्रकाश वानखडे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन माजी नगरसेवक केतन किरंगे तर आभार एपीआय प्रकाश वानखडे यांनी मानले.