40 कुटुंबीयांना कपड्यांसह महिनाभराचा किराणा वाटप


मुलाच्या स्मरणार्थ ललवाणी परिवाराचा दुर्गम आदिवासी पाड्यावर माणुसकीचा अभिनव जागर

भुसावळ : रावेर तालुक्यातील दुर्गम व पोहोचण्यास पायवाट हा जाण्याचा एकमेव मार्ग असलेल्या घाग्या व गारबर्डी धरणाच्या पायथ्याशी वसलेल्या पाड्यावर भुसावळ येथील ललवाणी परीवाराने अनोख्या पद्धतीने माणुसकीचा जागर केला. ललवाणी परीवाराने येथील 40 कुटुंबीयांना नवीन कपडे, भांडी व एक महिन्याचा किराणा स्व.स्वप्नील ललवाणी यांचे स्मरणार्थ वाटप केला.

ललवाणी परीवाराने गरजुंना दिला मदतीचा हात
भुसावळ येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. डी.एम.ललवाणी यांचे कनिष्ट पुत्र स्वप्नील मुंबई येथे बँक ऑफ अमेरीका या बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असताना त्यांना तीव्र हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. सारे काही नीटनेटके असताना हा दुःखाचा डोंगर सहन करणे परिवारास अशक्यप्राय होते. परंतु प्रा.डॉ. डी. एम. ललवाणी व परीवाराने या अचानक कोसळलेल्या संकटास धिरोदत्तपणे तोंड देत समाजापुढे एक आदर्श उभा केला. परीवाराने स्व.स्वप्नील ललवाणी यांचा नियोजित वाढदिवस साजरा न करता येण्याचे दुःख न करता गोर गरीब आणि मानवी वस्तीपासून कोसो दूर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धाग्या पाड्यावर व गारबर्डी धरणाच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी कुटुंबीयांना नवीन कपडे, भांडी व एक महिन्याचा किराणा देवून स्व.स्वप्नील ललवाणी यांची जयंती साजरी करीत गोर-गरीबांचे दुःख हलके केले. तसेच यावेळी लहान मुलांना कधी नव्हे ते बिस्कीट, चॉकलेट, फुगे व खेळणी देखील मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर हास्य पसरले. ललवाणी परीवाराने अनोख्या रीतीने हा माणुसकीचा जागर केल्याने एक नवा आदर्श समाजासमोर उभा राहिला आहे.


यांची होती उपस्थिती
प्रसंगी प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी, शोभा ललवाणी, कुसुंबा खुर्द ग्रामपंचायतीने सदस्य मुबारक तडवी, जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील, नलीन ललवाणी, मानस ललवाणी, प्रशांत कोटेचा व कमलेश निकुंभ उपस्थित होते.

मृत्यू पश्‍चात नियुक्तीचा मेल
स्व.स्वप्नील ललवाणी हे बँक ऑफ अमरीकेचे इंडिया हेड होते. भारतासह अनेक देशात त्यांना उच्च पदांच्या नोकरी मिळाल्या. उच्यतम पदावर जाण्याची त्यांची धडपड सुरू होती. स्व.स्वप्नील ललवाणी यांनी मृत्यूच्या दोन दिवस आधी बँक ऑफ अमेरिकेच्या असिस्टंट व्हाईस प्रेसीडेंट पदाकरीता मुलाखत दिली होती. जगभरातून 70 तज्ज्ञांनी मुलाखती दिल्या होत्या. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि स्वप्नील यांचे स्वप्न साकारले. त्यांना दोन दिवसांनी बँक ऑफ अमेरिकेच्या असीस्टंट व्हाईस प्रेसीडेंट पदी नियुक्ती करण्यात आल्याचा मेल प्राप्त झाला.

मुलाचे स्वप्न होते भारताची वाढावी शान
स्व.स्वप्नील बालपणापासूनच हुशार होता. तो एम.बी.ए.च्या सीईटीत उत्तर महाराष्ट्रात प्रथम आला होता. त्याचे स्वप्न होते की, एक दिवस देशाचे नाव उज्ज्वल करण्यात माझा खारीचा वाटा असेल. त्याचे स्वप्न साकारले पण दुर्दैवाने तो आज नाही. पण तरीही त्यांचे दुःख कवटाळत बसण्यात मी आणि पत्नी शोभा पुत्र सुयश व परीवाराने रंजल्या गांजल्याना सेवा देण्याचे ठरविले आहे. जेणे करुन आमचे जगणे सार्थक होईल, असे प्रा.डी.एम.ललवाणी म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !