भुसावळात दहा वर्षानंतर शवविच्छेदनाला सुरूवात
राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी केला वैद्यकीय अधीक्षकांचा सन्मान
भुसावळ : भुसावळात दहा वर्षानंतर शवविच्छेदनाला सुरूवात पालिकेच्या रुग्णालयात गुरुवारपासून शवविच्छेदनाला सुरूवात झाल्यानंतर भुसावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर चौधरी यांची भेट घेत त्यांचा सन्मान केला. भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ.नि.तु.पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर तब्बल दहा वर्षांनी भुसावळातील नगरपालिका रुग्णालयात शवविच्छेदन सुविधा सुरू करण्यात आल्याने पोलिस प्रशासन व नागरीकांमधून समाधानाची भावना व्यक्त करण्यात आली.
यांनी केला सन्मान
भुसावळ कृउबाचे सभापती सचिन चौधरी, नगरसेवक उल्हास पगारे, निलेश चौधरी, प्रकाश चौधरी, देवेंद्र सपकाळे आदींनी नगरपालिका रुग्णालयात जावून डॉ.मयूर चौधरी यांची भेट घेत त्यांचा सन्मान केला. पालिका रुग्णालयात शवविच्छेदन सुरू करण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी त्यांचे आभारही मानले.

भाजपा वैद्यकीय आघाडीचा यशस्वी पाठपुरावा
शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी असले तरी शवविच्छेदनासाठी कक्ष नव्हता तर नगरपालिकेच्या रुग्णालयात कक्ष असलातरी डॉक्टरांचा अभाव असल्याने भाजप वैद्यकिय आघाडीचे सहसंयोजक डॉ.नी.तू.पाटील यांनी ग्रामीण रुग्णालसाठी पालिकेने शवविच्छेदन कक्षाची मागणी केली होती. प्रशासनाने त्याची सकारात्मक दखल घेतल्याने तब्बल दहा वर्षांनी पालिका रुग्णालयात शवविच्छेदन कक्ष कार्यान्वीत करण्यात आला. बुधवारी रात्री महामार्गावर झालेल्या अपघातात भुसावळातील तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे गुरुवारी पालिका रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
विकासाचे व्हिजन असलेल्या डॉक्टरांनी करून दाखवले
भुसावळात गेल्या दहा वर्षांपासून शवविच्छेदन सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात होती मात्र त्यानंतरही स्थानिक स्तरावर शवविच्छेदन होत नव्हते मात्र विकासाचे व्हिजन व उच्चशिक्षीत डॉ.नि.तु.पाटील यांनी ही बाब हेरत प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा करीत स्थानिक स्तरावर शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध झाल्याने डॉ.पाटील निश्चितच कौतुकास पात्र आहेत. विकासाचे व्हिजन व काही काम करण्याचे ध्येय असल्यास अशक्यप्राय बाबही शक्य होते यादेखील यातून भुसावळकरांना दिसून आले.

