टीकटॉक स्टारसाठी प्रियकर सोडला : वर्षभराने मात्र तोच भावला
अनोख्या प्रेम कहाणी में ट्वीस्ट : प्रेम प्रकरण पोहोचले रावेर पोलिसात
रावेर : किसकी तलवार पर सर रखूं, ये बता दो मुझे,
इश्क करना खता है,
तो सजा दो मुझे
हा गाजलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटातील संवादाला साजेशी घटना रावेर तालुक्यात घडली. प्रेम विवाहानंतर पूर्वाश्रमीचा प्रियकर पुन्हा तिच्या जीवनात आल्यानंतर तिने पतीसोबत न राहण्याचा निर्णय घेतला आणि वाढलेला वाद रावेर पोलिस ठाण्यात पोहोचला व खाकीची नेमका काय निर्णय घ्यावा? याबाबत पंचायत निर्माण झाली. अखेर तूर्त त्या विवाहितेने आपल्या पतीसोबत रहावे व दोघांनी कुटुंबांनी आपसात याबाबत निर्णय घेण्याचा सल्ला मिळाल्यानंतर दाम्पत्य घरी पोहोचले.
प्रेम कहाणी में ट्वीस्ट
झाले असे की, उमरगा, जि.उस्मानाबाद येथील 20 वर्षीय टी.वाय.बी.ए.चे शिक्षण झालेली युवती औरंगाबादच्या एका कंपनीत जॉबला असताना सोबतच काम करणार्या 22 वर्षीय युवकाच्या प्रेमात पडली मात्र काही महिन्यानंतर रावेर तालुक्यातील एका खेड्यावरील युवकाचा टिक-टॉकवरील व्हिडिओ पाहून ही तरुण त्या खेड्यातील तरुणाच्या प्रेमात पडली व आधीच्या प्रियकराशी तिने ब्रेकअपही केले. दोघांनी गतर्षी जानेवारी 2019 मध्ये मध्यप्रदेशातील बर्हाणपूरात विवाह केला. सुखी संसाराची स्वप्ने सुरू असतानाच विवाहितेच्या जीवनात पूर्वाश्रमीचा प्रियकर आला व विवाहितेने आधीच्या प्रियकरासोबत जाण्याचा निर्णय घेतला. इकडे प्रियकराने गेल्या चार दिवसांपासून विवाहितेच्या गावात घिरट्यास सुरुवात केल्याने विवाहितेच्या पतीला शंका आली व बिंग फूटले. दाम्पत्यासह तो प्रेमी रावेर पोलिसात हजर झाल्यानंतर पोलिसांची डोकेदुखी वाढली. रावेर पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी तिघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र विवाहिता आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरासोबत जाण्यासाठी ठाम राहिली तर तिच्या पतीने थेट त्या युवकासोबत विवाहितेला जावू देण्यासाठी नकार दिला. दोघा कुटुंबियांनी आपासात निर्णय घ्यावा, असा सल्ला पोलिसांनी दिल्यानंतर विवाहिता पतीसह आपल्या गावी परतली.


