जळगावात सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिस उपअधीक्षकासह उपनिरीक्षकाकडून मानसिक त्रास होत असल्याचा आरोप
जळगाव : फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे व पोलिस उपनिरीक्षक जिजाबराव पाटील यांच्याकडून होणार्या मानसिक त्रासाला कंटाळून सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार शेक शकील शेख दगू यांनी पत्नीसह जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना 9 रोजी घडली. होती मात्र जिल्हा पेठ पोलिसांनी दोघांना वेळेत ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
लाचेचे पैसे बंद झाल्याने आकसातून कारवाईचा आरोप
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त सहाय्यक फैजदार शेख शकील शेख दगू हे पत्नी हजराबी शकील शेख व मुलगा साहिल यांच्यासह मिल्लत नगर, फैजपूर येथे राहतात. पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करत जनसेवेला सुरुवात केली आहे. दरम्यान, फैजपूर परीसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून ते बंद करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या तीन वर्षापासून ते लेखी तक्रारी करत आहे. यासाठी त्यांनी उपोषण ही केले होते. त्यानंतर परीसरातील अवैध धंदे बंद झाल्याने रावेर पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी नरेंद्र पिंगळे यांना मिळणारे लाचेचे पैसे बंद झाल्याने त्यांना राग आला असल्याचे म्हणत या रागा पोटीच त्यांनी आपला मानसिक छळ करणे सुरु केला असल्याचे शेख शकील शेख दगू म्हणाले. मानसीक त्रासाला कंटाळून आपण पत्नीसह आत्मदहन करत असल्याचे निवेदन सेवानिवृत्त सहाय्यक फैजदार शेख शकील शेख दगू यांनी जिल्हाधिकार्यांना देत 9 रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी वेळेत दाखल होत दोघांना ताब्यत घेतल्याने अनर्थ टळला.
आरोपात तथ्य नाही -जिजाबराव पाटील
शेख शकील यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. आकसातून ते आरोप करीत आहेत, यापूर्वी ते पोलिस खात्यात असतानाही त्यांच्याविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दिशाभूल करण्याचा हा प्रकार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक जिजाबराव पाटील म्हणाले. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.
