भुसावळात दोन बंद घरे फोडली : लाखोंच्या ऐवजावर डल्ला
भुसावळ : शहरात चोरटे मुक्कामी असून सातत्याने चोर्या-घरफोड्या सुरू असल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. शहरातील पाटीलमळा भागातील वकीलांचे बंद घर फोडून सुमारे 60 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आल्यानंतर शहरातील खडका रोड व शिवदत्त नगरात घरफोडी होवून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवदत्त नगरात घरफोडी
भुसावळ : शहरातील शिवदत्त नगरात या परीसरातील रहिवासी तथा रेल्वे कर्मचारी संतोष घोडे हे त्यांची पत्नी मीनाक्षी घोडे या कुटुंबासह कल्याण येथे कामानिमित्त गेले असल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घोडे यांच्या घराच्या मुख्य दाराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 85 हजार रुपये रोख व दागिने असा सुमारे एक लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

मुस्लीम कॉलनीत घरफोडी
भुसावळ : शहरातील खडका रोडवरील मुस्लीम कॉलनी परीसरातील बंद घरातून चोरट्यांनी एक लाख 25 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना शनिवारी रात्री नऊ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात रूक्साना बी.ईस्माईल शेख (40, खडका रोड, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शेख ईस्माईल शेख हे व्यवसायाने ट्रक चालक असून ते बाहेरगावी गेले होते तर त्यांच्या पत्नी भुसावळ शहरात मुलाकडे आल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत घराच्या एक्झॉस खिडकीतून प्रवेश करीत कपाटातील 90 हजारांची रोकड, 9 ग्रॅम वजनाचे व 25 हजार रुपये किंमतीचे मणी मंगळसूत्र, 10 हजार रुपये किंमतीचा टीव्ही आदी मिळून एक लाख 25 हजारांचा मुद्देमाल लांबवला. चोरीची माहिती कळताच उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक दिलीप भागवत, सहा.निरीक्षक कृष्णा भोये आदींनी भेट देत पाहणी केली. शनिवारी रात्री 11 वाजता बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.

