मुक्ताईनगरात जुगार अड्ड्यावर छापा : आठ जुगारी जाळ्यात
मुक्ताईनगर : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मुक्ताईनगरात छापा टाकत रंगात आलेला जुगाराचा डाव उधळत आठ जुगार्यांची मुसक्या आवळत पाच लाख 61 हजार रुपयांचा रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला. रविवारी सायंकाळी मुक्ताईनगर खामखेडा-रस्त्यावर एका शेतात ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
खामखेडा रस्त्यावरील महादेव मंदिराच्या पुढे नदीपात्राच्याजवळ असलेल्या एका शेतामध्ये जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक यांच्यासह पथकातील विकास वाघ, संजय हिवरकर, दीपक चौधरी, राजेश मेंढे, रवी नरवाडे, रमेश चौधरी, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, प्रमोद लाड वंजारी, ईशांत तडवी यांच्या पथकाने सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

पाच लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त
याप्रसंगी दोन लाख 80 हजार रुपये रोख रकमेसह सहा हजार रुपयांची विदेशी दारू तसेच दुचाकी मिळून पाच लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रसंगी अजय अरुण जावरे, मनोज नामदेव जाधव, निलेश लिलाधर वाणी, विनोद ज्ञानदेव कांडेलकर, निलेश कडू तळेले, राजेश प्रकाश जावरे, शेख बिस्मिल्ला शेख सांडू, विठ्ठल कडू तळेले अशा आठ जणांविरुद्ध कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली व नंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.

