पाळधी औट पोस्टचा लाचखोर पोलिस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात
15 हजारांची लाच भोवली : औट पोस्टच्या आवारातच केली अटक
जळगाव : अपघातग्रस्त वाहन सोडण्यासह अपघाताच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पाळधी पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल सुमीत पाटील यांना सोमवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास जळगाव एसीबीच्या पथकाने आऊट पोस्टच्या आवारात रंगेहाथ अटक केल्याने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
वाहन सोडण्यासाठी मागितली होती लाच
भुसावळ येथील 27 वर्षीय तक्रारदाराच्या वाहनाचा अपघात होवून त्यात एका जणाचा मृत्यू ओढवला होता. शिवाय या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वाहन जप्त केल्याने कागदपत्रात मदत करण्यासाठी व जप्त वाहन सोडण्याच्या मोबदल्यात आरोपी सुमीत संजय पाटील (गट नं.25, प्लॉट नं.9, संत निवृत्ती नगर, जळगाव) यांनी 29 रोजी 15 हजारांची लाच मागितली होती. या संदर्भात एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला. दुपारी दिड वाजेच्या सुमारास आरोपीने पंचांसमक्ष लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय रवींद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार सुरेश पाटील, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा यशस्वी करण्यात आला.

