मुलाने चोरलेले दागिने महिलेला परत मिळताच गहिवरली महिला
रावेर : तालुक्यातील निरूळ येथे झालेल्या घरफोडीनंतर पोलिस तपासात फिर्यादीचा मुलानेच चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली होती. या प्रकरणी रावेर न्यायालयाने तक्रारदाराला मुद्देमाल परत करण्याचे आदेश दिल्यानंतर सोमवारी महिलेला मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी महिलेला चोरी गेलेला ऐवज परत मिळताच गहिवरून आले.
85 हजारांच्या मुद्देमालावर मुलानेच मारला डल्ला
निरूळच्या तक्रारदार सयाबाई योगराज खैरे (50) यांच्या घराला कुलूप असताना चोरट्याने 15 डिसेंबर रोजी संधी साधत 20 हजारांची रोकड, 35 हजारांची सोन्याची अंगठी, 30 हजारांच्या पाटल्या, चांदीचे कडे मिळून 85 हजारांचा मुद्देमाल लांबवला होता. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर जाधव, जगदीश पाटील, महेंद्र सुरवाडे, प्रमोद पाटील, सुरेश मेढे, मुकेश तडवी, महेश मोगरे, कुणाल सोनवणे, विशाल पाटील, प्रमोद पाटील आदींना ही घरफोडी तक्रारदाराचा मुलगा जितेंद्र योगराज खैरे याने केल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेला मुद्देमाल काढून दिला. रावेर न्यायालयाने न्या.राठोड यांनी परत करण्याचे आदेश दिल्यानंतर सोमवारी तो तक्रारदार महिलेला परत करण्यात आला. यावेळी सयाबाई म्हणाल्या की, साहेब मला हे स्वप्नादेखील वाटले नव्हते की माझा चोरीस गेलेला मुद्देमाल मला परत मिळेल व माझाच मुलगा चोर निघेल ! यावेळी दागिन्यांकडे पाहुन महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळल्याने वातावरण भावनिक झाले होते.


