भुसावळात सलग चौथ्या दिवशी घरफोडी
प्रभात कॉलनीत बंद घर फोडून एक लाख 10 हजारांचा ऐवज लांबवला
भुसावळ : शहरात चोर्यांसह घरफोड्यांचे सत्र कायम असून सलग चौथ्यांदा घरफोडी झाल्याने शहरवासी धास्तावले आहे. शहरातील प्रभात कॉलनीतील बंद घर फोडून चोरट्यांनी 55 हजारांच्या रोकडसह एक लाख 10 हजारांचा ऐवज लांबल्याची घटना सोमवार, 11 रोजी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिसात गुन्हा दाखल
शहरातील पवन नगर, प्रभात कॉलनी परीसरातील प्रमोद पाटील यांच्या घरात तक्रारदार प्रशांत भरतराव बेहरे कुटुंबासह राहतात. बेहरे हे कामानिमित्त कुटुंबास नाशिकला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून 55 हजारांची रोकड, दोन तोळे वजनाचे व 55 हजार रुपये किंमतीचे दागिने, पाच हजार रुपये किंमतीचे सहा भार चांदीचे दागिने, लेडीज पर्स व फोर व्हिलरची चावी लांबवली. 9 ते 10 दरम्यान ही घरफोडी झाल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी भेट देवून पाहणी केली. तपास सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.


