भुसावळात डंपर-एस.टी.चा अपघात टळला
भुसावळातील नवोदय विद्यालयाच्या परीसरातील घटना : बसमधील 55 प्रवासी सुखरूप ; दुसर्या बसने जळगावी केले रवाना
भुसावळ : डंपर व एस.टी.ची धडक होणार तोच चालकाने समय सुचकता दर्शवल्याने एस.टी.बसचा अपघात टळला मात्र बसची दोन्ही चाके सबवेच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या ड्रेनेजमध्ये उतरले मात्र बसमधील 55 पैकी एकाही प्रवाशाला साधे खरचटले देखील नाही. शहरातील महामार्गावरील नवोदय विद्यालयाच्या परीसरात सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
एस.टी.चालकाचे प्रसंगावधान
भुसावळ ते जळगाव जाणार्या एस.टी. (एम.एच.20 बी.एल 3457 ला) नवोदय विद्यालयाजवळील अंडरपासला समोरून भरधाव वेगाने येणार्या डंपरने कट मारला. एस.टी.च्या चालकाने प्रसंगावधान ठेवून रस्त्यांच्या कडेला गाडी उतरवल्याने मोठा अपघात टळला. दरम्यान गटारीत एसटीचे दोन्ही चाके उतरली. या गाडीत 55 प्रवासी होते मात्र कोणालाही साधे खरचटले नाही. दरम्यान, तत्काळ भुसावळ डेपोची दुसरी गाडी बोलविल्यानंतर प्रवाशांना जळगावकडे रवाना करण्यात आले. एस.टी.चे ही कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. डंपर मालकाने क्रेन बोलवून ड्रेनेजमध्ये अडकलेली एस.टी. बाहेर काढली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा मात्र दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.


