खंडणी प्रकरण : दोघा आरोपींना 15 पर्यंत पोलिस कोठडी


भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये काम करणार्‍या तरुणास गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करून दर महिन्याला पाच हजार रुपये खंडणीपोटी हप्ता देण्याची मागणी केल्याप्रकरणी हंसराज खरात व अमोल श्याम खिल्लारे उर्फ चिन्नाविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर आरोपींना भल्या पहाटे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत आरोपींना अटक केली होती. शुक्रवारी आरोपींना 12 पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना मंगळवारी भुसावळ न्यायालयात न्या.पी.व्ही.चिद्रे यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता त्यांना पुन्हा 15 पर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

रोकडसह चाकू जप्त
भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात दुचाकी पार्किंगचा मक्ता देण्यात आला असून तेथे काम करणार्‍या 22 वर्षीय तरुणाला हंसराज खरातसह अमोल श्याम खिल्लारे उर्फ चिन्ना तसेच एका अल्पवयीन संशयीताने गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करीत दर महिन्याला पाच हजार रुपये खंडणीपोटी देण्याची बुधवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास मागणी केली होती. रक्कम देण्यास नकार दिल्याने खिशातील एक हजार 200 रुपयांची रोकड लुटून नेल्याने आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून एक हजार 200 रुपयांची रोकड तसेच चाकू जप्त केला आहे तर गुन्ह्यात वापरलेला कट्टा जप्त करण्यासाठी मंगळवारी वाढीव पोलिस कोठडीची मागणी करण्यात आल्याने ती मान्य करण्यात आली. सरकारतर्फे सरकारी वकील अ‍ॅड.आर.एस.गवई तर आरोपींतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण आर.पाल यांनी काम पाहिले. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !