मका खरेदी केंद्रासाठी केंद्र सरकारने मका खरेदीचे उद्दीष्ट वाढवले
खासदार रक्षा खडसे यांनी मानले मंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार
भुसावळ : केंद्र सरकारद्वारे महाराष्ट्र राज्यात शासनाच्या आधारभूत किंमतीवर आधारीत शासकीय मका खरेदी केंद्र सुरू होती परंतु केंद्र सरकारचे अडीच लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण झाल्याने शासनातर्फे महाराष्ट्रातील सर्व शासकीय मका खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश 18 डिसेंबर रोजी काढल्याने शेतकर्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. खासदार रक्षा खडसे यांच्याकडे या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारने गरज भासल्यास आणि तसा प्रस्ताव त्यांच्याकडून आल्यास मका खरेदीसाठी आणखी मुदतवाढ देण्यास केंद्र सरकार तयार आहे, असे आश्वासन केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार रक्षा खडसे यांना दिलेले होते. त्यानुसार राज्य शासनाने प्रस्ताव पाठवला असता केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळून मका खरेदी सुरू करण्यासाठी उद्दीष्ट वाढवून दिल्याबाबतचे पत्र मंगळवारी राज्य सरकारला प्राप्त झाले आहे.

