वाचन संस्कृती रुजविण्यासाठी पुस्तक भेट उपक्रम
चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती डी.पी.साळुंखे यांचा स्तुत्य उपक्रम
भुसावळ : तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक जण मोबाईल अथवा संगणकाचा वापर करत असल्याने वाचन करण्याची सवय कमी झालेली आहे यामुळे शब्द भांडार कमी होऊन लेखन अथवा वकृत्व करण्याची सवय समाजात कमी होत आहे. वाचन संस्कृती रुजावी यासाठी घरी येणार्यांना पुस्तक रुपी भेट देऊन वाचन संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न पंचायत समितीचे माजी सभापती डी.पी.साळुंखे करीत आहेत.
यांची होती उपस्थिती
यावेळी इब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर.धनगर, शिक्षक परीषदेचे जिल्हा उपाध्यक्ष एस.एस.अहिरे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक संजू भटकर, भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जे.पी.सपकाळे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील, विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे, अनिल माळी, आर.बी.पाटील आदी उपस्थित होते.

वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी स्तुत्य उपक्रम
पंचायत समिती चोपडा येथील माजी सभापती तथा सर्वोदय हायस्कूल किन्ही, ता.भुसावळ येथील शिक्षक डी.पी.साळुंखे यांनी वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. घरी येणार्याला प्रत्येक व्यक्तीला पुस्तक भेट देऊन वाचन झाल्यानंतर इतरांना ही पुस्तके द्यावी, अशा प्रकारची विनंती करतात. जिजाऊ जयंती व त्यांचा वाढदिवस असल्याने घरी येणार्याला प्रत्येक व्यक्तीला त्यांनी पुस्तकांची भेट दिली. या माध्यमातून विविध पुस्तकांचे वाचन होऊन शब्दभांडार वाढणार आहे व नवनवीन माहिती वाचण्यास मिळेल तसेच वाचन झाल्यानंतर हे पुस्तक इतरांना द्या त्या ज्ञानाचा उपयोग इतरांनीही होईल व वाचन संस्कृती वाढवता येईल, असा संदेश त्यांनी यावेळी दिला
वाचनामुळे विचार करण्याची क्षमता वाढते
नवीन पिढी मोबाईल अथवा संगणकावरच विविध खेळ खेळतात यामुळे त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर परीणाम होत असतो परंतु घरामध्ये वाचनाची सवय असल्यास लहान मुलांनादेखील ही सवय जडेल व वाचन संस्कृती वाढून बौद्धिक क्षमता वाढविण्यास मदत होईल यामुळे पुस्तक भेटीचा उपक्रम सुरू केला असल्याचे चोपडा पंचायत समिती माजी सभापती डी.पी.साळुंखे म्हणाले.

