रोजंदारी कर्मचार्याचा मृतदेह मुख्याधिकार्यांच्या दालनात
चाळीसगाव : शासनातर्फे पात्र ठरलेल्या सफाई कर्मचार्यांच्या यादीत आपले नाव नसल्याने येथील नगरपालिकेतील सफाई कर्मचारी बापु त्र्यंबक जाधव (55) यांना धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांचा हृदयविकाराचा झटका येवून त्यात मृत्यु झाला. या प्रकाराने संतप्त कुटुंबियांसह सफाई कर्मचार्यांनी जाधव यांचा मृतदेह पालिकेत मुख्याधिकार्यांच्या कार्यालयातच नेल्याची घटना चाळीसगावात बुधवारी घडली. दरम्यान, वारसांना दोन लाखांचा मदतीचा धनादेश देण्यात आल्यानंतर मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
दोन सफाई कामगारांचा मृत्यू
गेल्या 40 वर्षापासून हे कर्मचारी काम करीत आहेत मात्र त्यांना अद्यापही कायम केले जात नाही, आणखी किती जणांचे बळी घेणार असा संतप्त सवाल मयत जाधव यांच्या कुटुंबियांनी केला. जोपर्यंत मयताच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह इथून हलणार नाही, असा पवित्रा घेत मुख्याधिकार्यांच्या दालनातच ठिय्या दिला. अखेर मृताच्या कुटुंबास तातडीची मदत देण्याबरोबरच कुटुंबातील एकाला पालिकेत नोकरी देण्यासंबंधीत कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह घरी नेला. दरम्यान जाधव यांच्या पाठोपाठ आणखी एका महिला कर्मचार्याचाही पात्र यादीत समावेश न झाल्याने धक्का बसला व त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यात त्यांचा मृत्यु झाला. दोघा सफाई कर्मचार्यांचा मृत्यु झाल्याने पालीकेतील सफाई कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पात्र यादीत नाव नसल्याने बसला धक्का
चाळीसगाव नगरपालिकेत सुमारे 119 सफाई कर्मचारी गेली 40 वर्षापासून काम करीत आहे. मात्र त्यांचा कायम करण्याचा प्रश्न वर्षोनुवर्षे प्रलंबित आहे. नुकतेच शासनाने या पैकी 40 कर्मचारी पात्र ठरवले. या पात्र कर्मचार्यांची यादी लावण्यात आली. या यादीत बापु त्र्यंबक जाधव (55) यांचे नाव नव्हते. त्याचा जाधव यांना धक्का बसला.त्यांनी उपमुख्याधिकारी स्नेहल फडतरे यांच्याकडे धाव घेतली. गेली 40 वर्षापासून मी काम करीत आहे, माझे कसे होईल ? अशी वेदना त्यांनी मांडली. त्यावेळी उपमुख्याधिकारी फडतरे यांनी त्यांची समजूत काढली, पुढच्या यादीत नाव येईल म्हणून दिलासा दिला मात्र पात्रता यादीत नाव नसल्याने बापु जाधव यांना नैराश्य आले. ते घरी गेले. रात्रभर ते बैचन होते. बुधवारीज सकाळी 6 वाजता नेहमीप्रमाणे उठून प्रभागात कामाला गेले. तेथे त्यांना अचानक उलटी झाल्याने दवाखान्यात गेले. डॉ्नटरांनी तपासून त्यांना घरी जावून आराम करण्यास सांगितले. मात्र घरी असतांना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. या प्रकाराने कुटुंबीयासह सफाई कर्मचारी धास्तावले. त्यांनी जाधव यांचा मृतदेह नगरपालिकेत मुख्याधिकार्यांच्या दालनात नेऊन संताप व्यक्त करीत पालिकेच्या अधिकार्यांना आणखी किती कर्मचार्यांचा बळी घेणार? असा जाब विचारला. 40 वर्षापासून आम्ही सेवा बजावत आहोत. सफाई कर्मचार्यांच्या जीवाशी खेळ होत असून कर्मचार्यांनी कुठे जायचे? असा सवाल केला. मृत जाधव यांनी शहरासाठी आपले आयुष्य घातले त्यामुळे त्यांच्या कुटुंबास तातडीने मदत देवून त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्याव, अशी मागणी केली काही कर्मचार्यांना कायमच्या ऑर्डरी मिळाल्या तर काही कर्मचारी यासाठी पात्र असून देखील त्यांना कायम का केले नाही याची चौकशी करावी अशी मागणीही यावेळी केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी मुख्याधिकारी शंकर गोरे, उपमुख्याधिकारी स्नेहल फडतरे, नगरसेवक रामचंद्र जाधव, राजेंद्र चौधरी, घृष्णेश्वर पाटील आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी यावेळी मंत्रालयातील नगरविकास विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.संबंधीत अधिकार्यांनी सफाई कर्मचार्यांची नवीन यादी विभागीय आयुक्तांमार्फत पाठवा अशी सुचना केली.
मृत कर्मचार्यास तातडीची मदत
दरम्यान मृत कर्मचारी बापु जाधव यांच्या कुटुंबियास नगरपालीकेतर्फे तातडीची 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यापैकी 2 लाख रुपयांचा धनादेश तत्काळ देण्यात आला तर उर्वरीत तीन लाख रूपयांची मदत पालिकेच्या सर्व साधारण सभेत ठराव मांडून मंजुरी घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. तसेच या कुटूंबियातील वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी विशेष बाब म्हणून मंत्रालयात प्रस्ताव पाठवू व त्याबाबत पाठपुरावा करू, असे आश्वासन दिल्यानंतर सफाई कर्मचार्यांनी दुपारी दीड वाजता आपला ठिय्या मागे घेत मृतदेह घरी नेला.


