श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी संकलन अभियानाचा सावद्यात शुभरंभ


सावदा : अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिर उभाणीसाठी समाजातील प्रत्येक व्यक्तिचा हातभार असावा या उद्देशाने संपूर्ण भारतातून यासाठी निधी संकलीत करण्यात येत आहे. याच अभियानाचा भाग म्हणून सावदा येथे बुधवार, 13 रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी संकलन अभियान कार्यालयाचे संत महंताच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. बस स्थानकाजवळील दुर्गा माता मंदिरापासून ते कार्यालय असलेल्या इंदिरा गांधी चौकापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन
बबन बडगे, नरसिंगभाऊ पुर्भी यांच्याहस्ते राम निधी संकलन कार्यालयाचे उद्धघाटन करण्यात आले. यावेळी स्वामीनारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री भक्तीकिशोरदासजी, महामंडलेश्वर पुरूषोत्तमदासजी महाराज, सुरेशशास्त्री मानेकर बाबा, शास्त्री वासुदेव चरणदासजी, शास्त्री तरुण सागरदासजी, गोविंदशास्त्री, दीपक भगत, अभियान समिती रावेर तालुकाध्यक्ष डॉ.विलास पाटील, विश्व हिंदू परीषदेचे जिल्हा संयोजक योगेश बोरोले आदी संत मंडळी उपस्थित होते.


प्रत्येकाच्या सहभागाने बनावे मंदिर
शास्त्री भक्तीकिशोरदासजी म्हणाले की, प्रत्येकाचा हातभार राम मंदिरासाठी लागण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा म्हणून हे आयोजन आहे. राम मंदिरासाठी करोडो रुपये देणारे आहेत पण प्रत्येकाच्या सहभागाने हे मंदिर बनावे ही साधू-संतांची इच्छा होती. आपली शक्ती चांगल्या कामासाठी वापरा असेही ते म्हणाले. सुरेशशास्त्री मानेकर बाबा म्हणाले की, राम मंदिराचा गोवर्धन सर्वांनी मिळून उचलण्यासाठी हे निधी संकलन असून निधी संकलनपेक्षा जन संकलन महत्वाचे आहे. महामंडलेश्वर पुरषोत्तमदासजी यांनी सढळ हाताने मदतीचे आवाहन केले.

अनेकांनी दिला मदतीचा धनादेश
या कार्यक्रमात येथील किसान दूध उत्पादक संस्थेतर्फे 11 हजार रूपयांचा धनादेश समितीला देण्यात आला. स्वामीनारायण गुरूकुल संस्थेतर्फे एक लाख 21 हजार रुपये, वसंत विश्वनाथ महाजन तांदळवाडी यांच्यातर्फे एक लाख रुपये यावेळी देण्यात आले. सूत्रसंचालन नंदू पाटील तर आभार अ‍ॅड.कालिदास ठाकुर यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंदिर निर्माण निधी संकलन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी परीश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !