भुसावळातील खंडणी प्रकरण : दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी


भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये काम करणार्‍या तरुणास गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करून दर महिन्याला पाच हजार रुपये खंडणीपोटी हप्ता देण्याची मागणी केल्याप्रकरणी हंसराज खरात व अमोल श्याम खिल्लारे उर्फ चिन्नाविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. बुधवार, 6 जानेवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर आरोपींना भल्या पहाटे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत आरोपींना अटक केली होती. सुरुवातीला आरोपींना 12 पर्यंत व नंतर पुन्हा 15 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी आरोपींना न्या.पी.व्ही.चिद्रे यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता पोलिसांनी पुन्हा कोठडीची मागणी केली मात्र आरोपींच्या वकीलांनी त्यास विरोध केल्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपींना 27 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

मंगळवारी जामिनावर कामकाज
आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर मंगळवारी न्या.चिद्रे यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, आरोपींनी गुन्ह्यात कट्टा वापरला असलातरी तो तपासात मिळून न आल्याने आरोपींविरुद्ध पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भादंवि 201 कलम वाढवण्यात आले आहे. सरकारतर्फे सरकारी वकील अ‍ॅड.भास्कर पाटील तर आरोपींतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण आर.पाल यांनी काम पाहिले. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !