भुसावळात झोका खेळताना गळफास लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू
एकुलता एक ‘दीप’ विझल्याने कुटुंबाला शोक अनावर : बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
भुसावळ : झोक्याशी खेळत असताना दोर गळ्याशी आवळला गेल्याने 11 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हनुमान नगराजवळील भंगाळे चाळीत शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. दीपांकर प्रमोद भंगाळे (11, हनुमान नगर, भंगाळे चाळ, भुसावळ) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने या परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
झोका खेळताना गळ्याशी आवळला दोर
कांदा विक्री करणारे व्यावसायीक प्रमोद भंगाळे यांचा एकुलता एक मुलगा दीपांकर हा ताप्ती शाळेत पाचवीचे शिक्षण घेत होता. शनिवारी दुपारी वडिल कामानिमित्त बाहेर पडले तर आईदेखील शेतात गेल्याने दीपांकर हा घरी झोक्याशी खेळत असताना झोक्याचा दोर त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला मात्र प्रयत्न करून त्यास बाहेर निघता न आल्याने त्याचा मृत्यू झाला. भंगाळे यांच्या घराशेजारीच त्यांचे बंधू राकेश लक्ष्मण भंगाळे राहतात. त्यांची कन्या दुपारी साडेतीन वाजता दीपांकर यास पाहण्यासाठी आली असता दीपांकर झोक्याला उलट्या अवस्थेत लटकलेला दिसल्याने तिने घरच्यांना माहिती कळवल्यानंतर तातडीने त्यास डॉक्टरांकडे नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एकुलत्या एक मुलाच्या अकाली मृत्यूने नातेवाईकांनी टाहो फोडल्याने उपस्थितांनाही गहिवरून आले. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी राकेश लक्ष्मण भंगाळे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.



