भाजपाच्या जि.प.सभापतींकडून मंजूर कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न


शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील यांची पत्रपरीषदेत माहिती

यावल : जिल्हा परिषदेचे सभापती रवींद्र पाटील ह्यांच्या प्रेस नोटमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत साकळी जिल्हा परिषद गटामध्ये मंजूर काम हे आम्ही मंजूर करून आणले आहेत, असे नमूद केले होते. त्यावर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील यांनी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रविवारी, 24 जानेवारी रोजी पत्रपरिषद घेतली. त्यांच्या सोबत तालुका प्रमुख रवी सोनवणे, माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, शरद कोळी, पप्पू जोशी, संतोष धोबी उपस्थित होते.
चोपडा-यावल मतदार संघाच्या आमदार लता सोनावणे यांनी वारंवार मंत्रालयात जल जीवन मिशन अंतर्गत काम होण्यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी ना. गुलाबराव पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
चोपडा यावल मतदारसंघासाठी आमदार सोनवणे यांनी पाठपुरावा करून शर्ती पूर्ण प्रयत्न करून जलजीवन योजना मंजूर करून आणली. तरीही भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती रवींद्र पाटील हे या मंजूर कामांचे श्रेय घेतात, तरी कसे, असा प्रश्‍न उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील यांनी
उपस्थित केला.

कामांचे श्रेय उगाच कोणी घेऊ नये
ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात जळगाव जिल्ह्यातील अपूर्ण व प्रस्तावित नवीन पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक पार पडली. त्यात आमदार सोनवणे व माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा मतदार संघातील विविध 67 योजना जल जीवन मिशन अंतर्गत प्रस्तावित करणे तसेच लासूर व आठ गावे येथील रखडलेल्या योजनेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यात यावल तालुक्यातील गावांच्या पाणीपुरवठा योजना जलजीवन अंतर्गत मंजूर कराव्यात, असा ना.पाटील ह्यांना विनंती अर्ज केला होता. त्यावर 13 एप्रिल 20 रोजी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांना मंत्र्यांनी संबंधित गावांचे पाणी पुरवठा योजनांच्या अंदाजपत्रक मंजुरीसाठी त्वरित मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या गावांच्या पाणीपुरवठा योजनांना चालना मिळाली. तसेच त्यांना तात्काळ मंजुरी मिळाली आहे.
रवीद्र पाटील यांनी म्हटले योजना माझ्या प्रयत्नाने मंजूर झाली. त्यांनी या मंजुरीसाठी काय प्रयत्न केले. त्याचे पुरावे त्यांनी द्यावे. कोणाशी पत्रव्यवहार केला. संबंधित मंजुरीसाठी काय पाठपुरावा केला, त्याचा खुलासा पुराव्यानिशी करावा, असे आव्हान उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील यांनी पत्रपरिषदेत केले आहे. चोपडा-यावल मतदार संघाच्या आ.सौ.सोनवणे आणि माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांनी काय-काय पाठपुरावा आणि पत्रव्यवहार केला त्याची पुरावे म्हणून संबंधित पत्रांची छायांकित प्रत तसेच मंत्रालयात बैठक सुरू असताना ना.गुलाबराव पाटील, माजी आ.चंद्रकांत सोनवणे, आ. लता सोनवणे तसेच संबंधित अधिकार्‍यांसोबतचे बैठकमधील फोटोही पत्र परिषदेत पत्रकारांना दाखविण्यात आली. नेत्यांनी केलेल्या कामांचे श्रेय उगाच कोणी घेऊ नये, तुमचे सरकार होते. तुमचे पालकमंत्री होते, तेव्हा तुम्ही ही कामे का मंजूर करून आणली नाहीत, असा प्रश्‍नही शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील यांनी पत्र परिषदेत उपस्थित केला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !