बोदवडसह मुक्ताईनगर शहरासाठी 24 तास पाणीपुरवठ्यासाठी योजनांना द्यावी मंजुरी
राज्याचे नगरविकास मंत्र्यांना आमदार चंद्रकांत पाटील यांचे साकडे
मुक्ताईनगर : मतदारसंघातील बोदवड व मुक्ताईनगर येथील नवनिर्मित नगरपंचायतीद्वारा पूर्णा नदीपात्रातून काल बाह्य पाणीपुरवठा योजनांतून पाणीपुरवठा होत असल्याने या दोघा नगरपंचायतींना 24 तास शिरपूर पॅटर्न प्रमाणे अद्ययावत अशी जलशुद्धीकरण पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेच्या कामांना मंजुरी मिळावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुंबई येथील मंत्रालयात बुधवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली. बोदवड , सावदा व मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील महत्वपूर्ण विकास कामांसंदर्भात देखील सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, शुभम शर्मा, स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांची उपस्थिती होती.

दूषित पाण्यामुळे नागरीकांचा बळी
मुक्ताईनगर मतदार संघातील बोदवड व मुक्ताईनगर या अनुक्रमे नवनिर्मित नगरपंचायती आहेत. मुक्ताईनगर व बोदवड शहराला होणारा पाणीपुरवठा हा पूर्णा नदीच्या पात्रातून होत असून अतिशय गढूळ व गाळ आणि क्षारयुक्त असल्याने पावसाळ्यात नदीच्या पात्रातील पाणी खाली गेल्याने नदीपात्रात असलेल्या विषारी वनस्पतीमुळे होणार्या दूषित पाणीपुरवठयाने दरवर्षी विविध आजारांना लोक बळी पडतात. नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर नगरपरीषद मुक्ताईनगरतर्फे काही महिन्यांपूर्वी पाणीपुरवठ्याची योजना मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे परंतु सदरील योजनेस अनेक ठळक त्रृटी असल्याने शहर वासीयांना पुन्हा आहे त्याच धर्तीवर दूषित पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागेल त्यामुळे प्रस्तावित त्रृटी असलेल्या पाणीपुरावठ्याच्या प्रस्तावाऐवजी मुक्ताईनगर व बोदवड या दोघे नगरपंचयात हद्दीतील नागरीकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्याकामी शिरपूर पॅटर्न धर्तीवरील अद्ययावत अशी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात यावी तसेच दोघेही शहराच्या सुंदरतेत व स्वच्छतेत भर पडण्यासाठी भुयारी गटारी प्रकल्पास मंजुरी देण्यात येऊन निधी प्राप्त व्हावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बोदवड, सावदा व मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील महत्वपूर्ण विकास कामांसंदर्भात देखील सकारात्मक चर्चा करण्यात आली.


