भुसावळात चाकूच्या धाकावर 15 हजार लुटले : चौघांविरुद्ध गुन्हा
भुसावळातील दिनदयाल नगरजवळील घटना : कुविख्यात तस्लीम काल्या मुख्य आरोपी
भुसावळ : पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार तस्लीम काल्याने पुन्हा चाकूच्या धाकावर तिघा मित्रांच्या मदतीने लुट केल्याची घटना दिनदयाल नगराजवळ शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम शेख आणि फिरोज शहा हसन शहा यांना रविवारी पहाटे अटक करण्यात आली.
चाकूच्या धाकावर केली लूट
मुक्ताईनगर तालुक्यातील मोरझिरा येथील बळीराम किसन बाणाईत हे भुसावळ येथे शनिवारी दुपारी कॅमेरा दुरूस्तीसाठी आले असता दिनदयाल नगरसमोरील रस्त्यावर दुकानाची चौकशी करीत असतांना तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम शेख यांच्यासह चार जणांनी येत बाणाईत यांना दमबाजी करीत मी जेलमधून आताच सुटलो असून खिशातील सर्व पैसे देण्यासाठी चाकूच्या धाकावर धमकावले मात्र बाणाईत यांनी पळ काढल्यानंतर आरोपींनी पाठलाग करीत बाणाईत यांना रस्त्यावर आडवे पाडून त्यांच्या खिशातील 15 हजार रुपये घेवून संशयीत पसार झाले. बळीराम बाणाईत यांना लूटमार केल्याप्रकरणी बाणाईत यांच्या फिर्यादीवरून तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम शेख (रा. दिनदयाल नगर, भुसावळ), फिरोज शहा हसन शहा, गिरीष गोकुळसिंग जोहरी, सैय्यद अरमान सैय्यद अमान (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहा.पोलिस अधीक्षक अर्चीत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील पुढील तपास करीत आहे. दरम्यान, आरोपी फिरोज शहा यांची तब्येत खालावल्याने त्याच्यावर बंदोबस्तात जळगावी उपचार सुरू आहेत.

