लूट प्रकरण : तस्लीम काल्यासह दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
भुसावळ : मुक्ताईनगर तालुक्यातील मोरझिरा येथील बळीराम किसन बाणाईत या युवकाला, दीनदयाल नगरसमोरील रस्त्यावर मारहाण करून खिशातील 15 हजार रूपये काढून घेतल्याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर करत पोलिसांनी ओळख परेडसाठी पोलिस कोठडीचा हक्क राखून ठेवत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. संशयित तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम शेख यांच्यासह चार जणांनी बाणाईतला लुटले होते. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तस्लीम काल्या, फिरोज शहा हसन शहा, गिरीश गोकुळसिंग जोहरी, सैय्यद अरमान सैय्यद अमान (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तस्लीम काल्या आणि फिरोज शहा यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर संशयित शहा याची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे मंगळवारी दोघांसाठी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. आता अटकेतील दोन्ही संशयितांची ओळख परेड होणार आहे.

