कोरोना योद्ध्यांचा कर्मवीर पुरस्काराने सन्मान
भुसावळातील साई निर्मल फाउंडेशनचा उपक्रम
भुसावळ : सेवा, संवाद, समर्पण, संघर्ष आणि सम्मान हा पाच तत्वावर आरोग्य सेवकांचे कार्य असून कोरोना काळात आरोग्य सेवकांनी केलेल्या कार्यामुळे करोना संक्रमण दर कमी झाला, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील यांनी केले. साई निर्मल फाउंडेशनने, भुसावळ या संस्थेने भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योध्यांचा नुकताच सत्कार केला. अध्यक्षस्थानी नेत्ररोग तज्ञ डॉ.नि.तु.पाटील होते.
संस्थेचे कार्य कौतुकास्पद
कोरोना काळात स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता काम करणारे, अहोरात्र सर्वांसाठी निस्वार्थ भावनेने सेवा देणार्या भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर मधील कर्मचार्यांना कर्मवीर पुरस्कार सम्मान पत्र, गुलाब पुष्प आणि रामरक्षा देत सत्कार माझ्या हस्ते होत आहे हे मी माझे भाग्य समजतो. विविध क्षेत्रातील चार हजार 550 कोरोना योद्ध्यांना ‘कर्मवीर पुरस्कार’ हा ई सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्याचे कार्य साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी केले असून ते कार्य कौतुकास्पद असल्याचे डॉ.पाटील म्हणाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील, ग्रामीण रुग्णालय अॅण्ड ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर चौधरी, डॉ.बी.एच.चाकूरकर, साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिशिर जावळे, सामाजिक कार्यकर्ते आर.के.कोळी, सतीश महाजन व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रशेखर पाटील यांनी तर प्रास्ताविक संस्था अध्यक्ष शिशिर जावळे यांनी केले. याप्रसंगी भुसावळ ग्रामीण रुग्णालय ट्रामा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयुर चौधरी, वैद्यकीय अधिकारी बी.एच.चाकूरकर, यांच्यासह तेथील सर्व आरोग्य कर्मचार्यांना कर्मवीर पुरस्कार आणि रामरक्षा देऊन सन्मानीत करण्यात आले.
