ट्रक चालकावर चाकूचा हल्ला करीत लूटले : तिघांना अटक
रावेर : तुरीचे कट्टे घेवून जाणार्या ट्रक चालकाचा पाठलाग करून चाकूच्या धाकावर लुटल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. पोलिसांनी काही वेळेतच तीन संशयीतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ट्रक चालक अमीन समशोद्दीन व क्लीनर फरीद खान अनिस खान हे (दोघे चिरीया, जि.खरगोन, मध्यप्रदेश) येथील दिनेश जैस्वाल यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये (क्र.एम.पी.69 एच.9905) 280 क्विंटल तुरीचे कट्टे घेऊन अकोला येथे मंगळवारी रात्री जात असताना मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास रावेर -विवरे रस्त्यावर ट्रकचा वेग कमी असताना त्यावर तीन चोरटे चढले, तसेच त्यांनी चाकूचा धाक दाखवून चालकाला ट्रक थांबवले. चोरट्यांनी चालक व क्लीनरला ट्रक बाहेरून ओढून मारहाण करीत दोघांना चोरट्यांनी रस्त्यालगतच्या जंगलात फरपटत नेत दोघांवर चाकूने तीन वार करत, मोबाईल व रोख 10 हजार असा एकूण 13 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल हिसकावून पोबारा केला. जखमी अवस्थेतच चालकाने ट्रक चालवत सावदा येथील पेट्रोल पंप गाठला. जखमी ट्रकचालकाला पाहून पंप चालकाने फैजपूरचे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांना रात्रीच घटनेची माहिती दिली.
गस्तीदरम्यान फोटो काढल्याने लुट प्रकरणाचा उलगडा
मंगळवारी रात्री रावेर शहरात सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक हे पथकासोबत गस्तीवर असताना तीन संशयीत युवकांचे त्यांनी फोटो मोबाईलमध्ये काढले होते. पोलिसांनी जखमी चालकाला तिघांचे फोटो दाखवले असता गुन्ह्यातील संशयित तेच असल्याची माहिती ट्रकचालकाने पोलिसांना दिली. त्यामुळे संशयीत गौरव विजय बिरपण, भूषण धनराज विचवे (दोघे रा. भाटखेडा) व मनीष सुरेश पवार यांना पोलिसांनी अटक करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

