दारूसाठी दहा रुपये न दिल्याने प्रौढाला मारहाण
रावेर : दारू पिण्यासाठी अवघे दहा रुपये न दिल्याने रागाच्या भरात प्रौढाला मारहाण करण्यात आल्याची घटना तालुक्यातील लालमाती येथे 19 रोजी दुपारी 3.30 वाजता घडली. रामसिंग मोहन पवार (55, रा.लालमाती ता. रावेर) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास शरीफ माजीत तडवी (रा.लोहारा, ता.पाचोरा) हा कामाच्या निमित्ताने गावात आला होता. दुपारी रामसिंग पवार यांच्याकडे शरीफ तडवी हा दारूच्या नशेत येवून दारू पिण्यासाठी 10 रूपये मागितले. रामसिंग यांनी पैसे न दिल्याने याचा राग येवून संशयित आरोपी शरीफ तडवी याने रामसिंग पवार याला मारहाण केली व डाव्या हाताच्या करंगळी वाकवून दुखापत केली. याप्रकरणी रावेर पोलिसात संशयित आरोपी शरीफ तडवी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजेंद्र राठोड करीत आहे.

