भुसावळच्या सायकलपटूंनी गाठला 600 किमीचा पल्ला
भुसावळ : धुळे येथे आयोजित बीआरएम 600 या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या प्रवीण फालक, गणसिंग पाटील, विद्याधर इंगळे, विजय फिरके, पंकज कुलकर्णी व विजय पाटील या सायकलपटूंनी सहभाग नोंदविला. शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस सायकल चालवून 40 तासांच्या आत सहाशे किमीचे अंतर पूर्ण करायचे होते. ही स्पर्धा आँडँक्स क्लब पारसियन, फ्रान्स आंतरराष्ट्रीय संस्थेच्या नियम व मानकाप्रमाणे पार पडली. शनिवारी सकाळी सहा वाजता धुळे येथून स्पर्धेस सुरुवात झाली. सुरुवातीस धुळे ते मध्यप्रदेश मधील टिक्री व तेथून पुन्हा परत धुळे असा 300 किमीचा टप्पा होता. या दरम्यान सात किलोमीटरचा अवघड असा बिजासनी घाटाचा देखील समावेश होता. त्यानंतरच्या टप्प्यात धुळे ते नाशिक व पुन्हा परत धुळे असे तीनशे किलोमीटरचे अंतर होते. या दरम्यान लळिंग घाट व चांदवड घाट पार करणे आव्हानात्मक होते. 40 तासांच्या अंतरात नाश्ता, जेवण व विश्रांती याचे नियोजन करणे प्रत्येक सायकलपटूसाठी यशाची गुरुकिल्ली होती.
केवळ 18 स्पर्धक सहभागी
स्पर्धा अवघड असल्यामुळे केवळ 18 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी 6 सायकलपटूंनी प्रकृती अस्वस्थ, सायकल पंक्चर आदी कारणांमुळे स्पर्धेतून मध्येच माघार घेतली परंतु उर्वरित 12 सायकलपटूंनी अतिशय निर्धाराने ही स्पर्धा नियोजित वेळेत पूर्ण केली. भुसावलच्या गणसिंग पाटील व विद्याधर इंगळे यांनी 200 किमी, 300 किमी, 400 किमी व 600 किमी या सर्वच गटात यशस्वी नोंदविला आहे. त्यांना ‘सुपर राँडोनियर’ चे प्रमाणपत्र फ्रान्सच्या संस्थेकडून प्राप्त होणार आहे. सर्व यशस्वी सायकलपटूंचे भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी येथे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रदीप सोलंकी, एम.पी.देशमुख, संदीप पाटील, प्रवीण पाटील उपस्थित होते. सर्व सहभागी सायकलपटूंचे कौतुक करण्यासाठी स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, धावपटू ,सायकलपटू, लेडीज इक्वॉलिटी रनच्या महिला धावपटू व शहरातील इतर नागरीक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरदेखील उपस्थित होते.

