निकृष्ट जेवणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा
यावल : तालुक्यातील मनवेल येथील अनुदानीत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट प्रतीचे जेवण मिळत असल्याच्या निषेधार्थ शाळेतील 31 विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर पायदळ येत मोर्चा आणला. सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन.बी.झंपरवार यांनी संतप्त विद्यार्थ्यांचे गार्हाणे ऐकून घेत त्यांनी वसतीगृह अधीक्षक वसंत पाटील यांची कानउघाडणी करुन विद्यार्थ्यांची समजूत काढीत त्यांना रवाना केले.
उत्कृष्ट जेवणाच्या आश्वासनाने विद्यार्थी रवाना
मनवेल येथे अनुदानीत आश्रमशाळा असून शाळेत सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता आठवी ते दहावीचे मुले व मुली मिळून 40ते पन्नास विद्यार्थी शाळेत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांंना मिळत असलेल्या निकृष्ट जेवणाबाबत अनेक वेळा तक्रार करूनही उपयोग न झाल्यामुळे इयत्ता आठवी ते दहावीच्या 31 विद्यार्थ्यांनी सायंकाळी सहा वाजता मनवेलहुन निघून तेरा किलोमिटर अंतर पायी चालत आदिवासी कार्यालय रात्री साडे आठला गाठले. रात्री उशिरापर्यंत सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन.बी. झंपरवार यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजूत घेत यापुढे उत्कृष्ट प्रतिचे जेवण देण्याबाबत अधीक्षक वसंत पाटील यांना तंबी देण्यात आली. कार्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या जेवणाची व प्रवासी वाहनाची व्यवस्था करून त्यांना माघारी रवाना करण्यात आले.

