नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे बोदवड शहरात पाणीटंचाई
आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्यांना सुनावले खडे बोल
बोदवड : शहरात गेल्या 20 दिवसांपासून नागरीकांना प्यायला पाणी मिळत नसल्याने फेब्रुवारी महिन्यातच ‘पाणीबाणी’ बघायला मिळत आहे. नगरपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे व कर्मचार्यांच्या बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे. नगराध्यक्ष व अधिकारी कर्मचारी यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत असल्याने शहरवासीयांना पाणीटंचाई सामोरे जावे लागत असल्याने या बाबीची दखल घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले व अन्य कर्मचार्यांची बैठक घेत विशेष सूचना केल्या.
पाईप लाईन फोडणार्यांवर गुन्हे दाखल करा
नूतन पाणीपुरवठा योजनेच्या ट्रायल बेससाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंते चार ते पाच दिवसांचा कालावधी घेतात परंतु प्रत्यक्षात आठ ते दहा दिवसांचा वेळ घेत असल्याने पाणीपुरवठ्यात खंड पडून शहरात टंचाई निर्माण होते. पाणीपुरवठ्याच्या पाईप लाईनचे काम पुर्ण झाल्यावरच फायनल ट्रायल बेस घेण्यात यावे, अश्या सुचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांना करत तोडगा काढला. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्याची चाहूल म्हणून पाईप लाईन फोडणार्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही यावेळेस करण्यात आल्या. शहराला पाणीपुरवठा करणार्या विहिरींची भूजल पातळी खालावल्याने नगरपंचायत परीसरातील विहिरी अधिग्रहीत कराव्यात, टंचाई आराखड्यात सुधारणा करून जुन्या बोअरवेल दुरुस्त तसेच आवश्यकता असल्यास नवीन प्रस्तावित कराव्या, नगरपंचायतीने बांधलेल्या कमी क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या अडचणीचा विषय ठरत असल्याने जास्त क्षमतेच्या टाक्या प्रस्तावित कराव्या त्यांना तातडीने निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत सांगितले. या पार्श्वभूमीवर जिल्हा परीषदेचे सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व एमजेपीचे कार्यकारी अभियंता यांच्यासोबत विशेष बैठक तातडीने बोलविणार असल्याचे यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

स्वच्छता न झाल्यास स्वतः स्वच्छता करणार : आमदारांची तंबी
शहरातील विविध मुद्दयांवर शिवसेनेकडून 12 रोजी ऊपोषण करण्यात आले होते. उपोषणस्थळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत सर्व मुलभूत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले मात्र म्हसोबा मंदिराजवळच्या पाण्याच्या टाकीची गळती दोन दिवसांत सोडवतो, असे नगराध्यक्षांनी सांगितले होते. दहा दिवस गेल्यानंतर ही नगराध्यक्ष यांनी शब्द पाळला नाही. गेल्या दोन वर्षापासून नागरीक या टाकीतून दूषित पाणी पित आहेत. नागरीकांच्या आरोग्यावर दुर्लक्ष करणे चुकीचे असून तातडीने पाण्याच्या टाकीची साफसफाई व गळतीचा प्रकार बंद न झाल्यास मी स्वत: उद्या 12 वाजता पाण्याच्या टाकीची सफाई करेल, अशी तंबी आमदार पाटील यांनी बैठकीत दिली.
यांची होती उपस्थिती
यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय अभियंता लोखंडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्यासह विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख गजानन खोडके, तालूका संघटक शांताराम कोळी, अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक कलिम शेख, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, शहरप्रमुख संजय महाजन, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक इरफान शेख, नगरसेवक असलम बागवान, विनोद पाडर, नईम खान, पवन माळी, गोपाळ पाटील, दीपक माळी, आतिष सारवान, युनूस सेठ बागवान, पंकज वाघ, अय्युब कुरेशी, निलेश माळी, योगेश राजपूत, साहेबराव काळबैले, आनंद खोडके, सोमेश्वर पाटील, डॉ.देविदास पाटील आदींची उपस्थिती होती.
