चोरट्यांचा कहर : यावलमध्ये पालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या मोटारी लांबवल्या


यावल : चोरट्यांनी आपला मोर्चा आता थेट पालिकेच्या पाणीपुरवठा करणार्‍या मोटारींकडे वळवत नगरपालिका साठवण तलावावरील फिल्टर प्लांटवरील पाणीपुरवठा करणारे 30 अश्वशक्तीच्या दोन मोटारी आणि अंदाजे 40 हजारांच्या वायरी लांबवत साहित्याचे नुकसान केले आहे शिवाय काही अंतरावरील डॉ.सतीश यावलकर यांचा मालकीचा पाणीपुरवठा करणार्‍या मोटारीची देखील चोरट्यांनी चोरी केल्याने खळबळ उडाली. 25 रोजी रात्री 9.30 वाजेनंतर ते 26 रात्री 12.30 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी अडीच लाखांच्या साहित्याची चोरी केली आहे. अज्ञात चोरट्यांविरूध्द यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अडीच लाखांच्या मोटारी लांबवल्या
यावल शहरातील हडकाई-खडकाई नदी पात्राला लागुन असलेल्या नगरपालिका पाणीपुरवठा साठवण तलावावरून शहराला पाणीपुरवठा होतो मात्र चोरट्यांनी पंप लांबवल्याने शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारी रात्री 12.30 वाजता अचानक बंद झाल्याने नेमके काय झाले हे पाहण्यासाठी फिल्टर प्लँटवरील कर्मचारी जॅकवेल हाऊसच्या पुलाजवळ ठेवण्यात आलेल्या स्टँडबाय पंपाची पाहणी करण्यासाठी गेले असता 30 हॉर्सपॉवरचे दोन सबमर्सिबल पंप (किंमत एक लाख 80 हजार) चोरी गेल्याचे आढळले शिवाय चोरट्यांनी जॅकवेल हाऊसच्या पक्क्या खोलीचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी इलेक्ट्रिक पंपाच्या व स्टॉर्टरच्या 35 स्केअर एम.एम.व्यासाच्या 50 मीटर लांबीच्या 410 हजार रुपये किंमतीच्या इलेक्ट्रीक कॉपरच्या वायर्स लांबवल्या. एकूण दोन लाख 20 हजार रुपये किंमतीचे साहित्य लांबवल्याप्रकरणी तसेच 50 हजार किंमतीचे इतर इलेक्ट्रीक साहित्याची नासधूस केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

खाजगी पंपही लांबवला
चोरट्यांनी सतीश सुपडू यावलकर यांची पाणीपुरवठा साठवण तलावाजवळील हडकाई- खडकाई नदी पात्राला लागून शेती आहे. चोरट्यांनी या शेतातील 10 व पाच एच.पी.क्षमतेचे 30 हजार रुपये किंमतीचे दोन इलेक्ट्रीक पंप लांबवले. शुक्रवारी सकाळी विद्युत पुरवठा सुरळीत होवूनही पाणी न आल्याने यावलकर यांनी पाहणी केली असता चोरी उघडकीस आली. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. फैजपूर डीवायएसपी नरेंद्र पिंगळे व सहकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, पंप चोरीमुळे शहराला एक दिवसाआड उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिका प्रशासनाने कळवले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !