शिरसोलीतील तरुणावर चाकूहल्ला
जळगाव- शिरसोली येथील विजय गंगाराम गवळी (25) संशयीत आरोपी पन्ना उर्फ पद्माकर प्रभाकर धनगर याने चाकूहल्ला केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहावाजेच्या सुमारास शिरसोली गावात घडली़ पोटात गंभीर दुखापत झाल्यामुळे विजय याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय गवळी हा शिरसोली येथे कुटूंबीयांसह वास्तव्यास असून शनिवारी रात्री तो कुटूंबीयांसह पुण्याला जाणार असतानाच वडीलांनी बचत गटाचे एक हजार 310 रुपये संबंधित व्यक्तीला देऊन ये, असे सांगितले़ त्यानुसार विजय हा मित्र दीपक पुंडलिक भील आणि गणेश भगवान बारी यांच्यासोबत दुचाकीने पैसे देण्यासाठी निघाला़ मित्राला तंबाखू घ्यायची असल्यामुळे गावातीलच एका पान टपरीजवळ विजयने दुचाकी थांबविली़ त्याचवेळी पन्ना धनगर त्याठिकाणी आला व त्याने दीपक याची मस्करी घेऊन शिविगाळ केली मात्र विजयने दीपकची मस्करी नको घेऊ असे, सांगताच पन्ना याने विजयला शिविगाळ करण्यास सुरूवात केली व डाव्या हातावर विजयच्या पोटात दोन वेळा वार करत त्यास गंभीर जखमी केली़ त्यानंतर आरोपी पन्ना पसार झाला.