सावदा पालिकेचा 60 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर


ऑनलाइन सभा नियमबाह्य असल्याचे सांगत विरोधकांचा सभेवर बहिष्कार

सावदा : सावदा पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवार, 26 रोजी ऑनलाईन पद्धतीने झाली. यावेळी सन 2021-2022 या वर्षासाठीचा अर्थसंकल्पासह 11 विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनिता येवले होत्या. सभेपूर्वी नगरसेवक राजेंद्र चौधरी व विरोधी पक्ष गटनेते फिरोज खान पठान यांनी शादिखाना हॉलसाठी जागेचा विषय काढला व सदर विषय मीटिंगमध्ये का घेण्यात आला नाही तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून असल्याने तसेच विशिष्ट समाजासाठीचा हा विषय टाळण्यात आला का? याबाबत विचारणा करण्यावरून दीर्घ काळ मंथन चालले.

विरोधकांचा सभेवर बहिष्कार
शादीखान हॉलच्या विषयावर बराच वेळ चर्चा झाली. नगराध्यक्षा यांनी यासाठी आपण स्वतंत्र सभा बोलावू, असे सांगितले पण विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी याच सभेत हा विषय महत्वाचा असल्याने घेणे गरजेचे असल्याचे सांगितल्यानंतर सभा ऑनलाईन घेण्यावरुनदेखील सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी यांचे सभेविषयी काही आदेश नसतानादेखील सभा ऑनलाईन का घेतली ? सभा ऑफलाईन घेता आली असती असे सांगत विरोधकांनी नगराध्यक्ष यांना निवेदन देवून सभेवर बहिष्कार टाकण्यात आला. यानंतर सत्ताधारी गटाचे नगरसेवकांच्या उपस्थितीत पुढील सभा घेण्यात आली. यात शहराच्या सन 2021-22 या आर्थिक वर्षाचा सुमारे 60 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यात कोणतीही करवाढ सूचविण्यात आली नसून शहर विकासाचे दृष्टीने विविध तरतूदी सूचविण्यात आल्या आहेत.

विविध विषयांना सभेत मंजुरी
सभेत शहरात विविध ठिकाणी खडी, गिट्टी टाकण्यासाठी वार्षिक करार करणे, पालिकेची चाँदनी चौक परीसरातील जुनी कन्या शाळा पाडणे, स्वामीनारायण नगर परीसरातील हनुमान मंदिराजवळ शेड उभारण्यासह सर्व विषयाना मंजूरी देण्यात आली.

सभा बेकायदेशीर : विरोधकांची पत्रकार परीषद
सभात्याग केल्यानंतर अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी व विरोधी पक्ष गटनेते फिरोजखान पठाण यांनी विश्रामगृहात पत्रकार परीषद घेतली. यात त्यांनी 50 पेक्षा कमी सभासद असले तर ऑफ लाईन मिटिंग घ्यावी, असे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश असताना ऑनलाईन सभा घेण्यात आली. सर्व राष्ट्रवादीच्या नगरसेवक व अपक्ष नगरसेवकांनी ही सभा नियमानुसार नसून ही सभा कलम 308 खाली रद्द करण्यात यावी म्हणून आम्ही मिटिंग वर बहिष्कार टाकला, असे विरोधी नगरसेवक म्हणाले. नगराध्यक्षांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले तसेच मागील मिटिंग मध्ये तहकूब केलेला आमोदा-पाल रस्त्याला माजी खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांचे नाव देण्याचा ठराव या मिटिंगमध्ये घेण्याचे सांगितले होते हा विषय या मिटींग मध्येही घेण्यात आलेला नाही, पत्रकार परीषदेत राष्ट्रवादीचे सावदा पालिकेतील विरोधी गटनेता फिरोज खान पठाण व माजी नगराध्यक्ष व विद्यमान अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. दरम्यान विरोधी गट नेते फिरोज खान पठाण यांनी सदर सभा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !